Kangana Ranaut : कुरुंदवाडमध्ये शिवसेनेकडून कंगनाच्या पुतळ्याचे दहन | पुढारी

Kangana Ranaut : कुरुंदवाडमध्ये शिवसेनेकडून कंगनाच्या पुतळ्याचे दहन

कुरुंदवाड, पुढारी ऑनलाईन : Kangana Ranaut : रक्त, घाम, अश्रू आणि त्यागातून मिळालेल्या आमच्या स्वातंत्र्याला ‘भीक’ असे संबोधणे हा राष्ट्रद्रोह आहे. अशा व्यक्तीस पुरस्कार देशाचे राष्ट्रपती ‘पद्मश्री’ पुरस्कार देऊन गौरवितात. स्वातंत्र्य व क्रांतिकारकांच्या बलिदानाची थोडी जरी जाण असेल तर अशा राष्ट्रद्रोही वक्तव्याबद्दल कंगना रणावतचा राष्ट्रीय पुरस्कार काढून घ्यावा आणि तिच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी शिवसेना जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांनी केला.

कुरुंदवाडमधील भालचंद्र थिएटर चौक येथे शनिवारी दुपारी दोन वाजता हातकणंगले लोकसभा मतदार संघ शिवसेनेतर्फे अभिनेत्री कंगना रणावतने केलेल्या वादग्रस्त वक्तव्याच्या निषेधार्थ कंगनाच्या पुतळ्याचे दहन करून आंदोलन करण्यात आले.

शिवसेना तालुकाप्रमुख वैभव उगळे म्हणाले, कंगना राणावत या भाजपवादी अभिनेत्रीचा वरचा मजला रिकामा असल्याने स्वातंत्र्य बद्दल त्याने असे देशद्रोही वक्तव्य केले आहे. लायकी नसणाऱ्या राणावत याने देशाची माफी मागावी अशी मागणी केली.

यावेळी महाराष्ट्र राज्य सहकार सेना प्रमुख शिल्पा सरपोतदार, पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख प्रदीप खोपडे, शहर प्रमुख सावगावे, अण्णासाहेब भिल्लोरे, उपजिल्हाप्रमुख सत्ताप्पा भवान, दत्ता पवार, मधुकर पाटील, नामदेव गिरी आदींनी आपल्या भाषणातून आक्रमक पवित्रा घेत आहे. कंगनाच्या पुतळ्याला जोडे मारो आंदोलन केले. कंगना राणावतवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणीही केली.

शिवसैनिकांनी ‘या कंगनाच करायचं काय, खाली डोकं वर पाय, कंगना रणावत माफी मागो, कंगना राणावतचा धिक्कार असो’ अशी घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला होता. यावेळी रामभाऊ माळी, प्रतिक धनवडे, संदीप पाटील, सयाजी चव्हाण, तेजस कुराडे, राजू बेले, संजय अनुसे, रघु नाईक, अप्पासाहेब भोसले, सुहास पासोबा, संजय माने, मिलिंद गोरे, जयवंत मंगसुळे, माधुरी ताकारी, मंगल चव्हाण आदी प्रमुख उपस्थित होते.

Back to top button