महाराष्ट्रात दंगली पेटवण्याचे कारस्थान सुरु; संजय राऊतांचा गंभीर आरोप | पुढारी

महाराष्ट्रात दंगली पेटवण्याचे कारस्थान सुरु; संजय राऊतांचा गंभीर आरोप

औरंगाबाद; पुढारी ऑनलाईन

महागाईचा आगडोंब उसळल्याने शिवसेनेने आज एल्गार केला आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज औरंगाबादमध्ये पेट्रोल, डिझेल आणि गॅस दरवाढीवरून मोदी सरकारवर कडाडून हल्ला चढवला. महाराष्ट्रात दंगली पेटवण्यासाठी कारस्थाने सुरु झाली असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला.

संजय राऊत आक्रोश मोर्चा दिल्लीपर्यंत पोहोचल्याचे म्हणाले. महागाई प्रचंड वाढल्याने रस्त्यावर उतरुन संघर्ष करण्याची गरज आहे. केंद्राच्या चुकीच्या धोरणांमुळे देशभरात १७ हजार व्यापाऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. हा आक्रोश हा अन्यायाविरुद्ध असून ही एक प्रकारची निजामशाही असल्याचे संजय राऊत म्हणाले.

संजय राऊत यांनी आज औरंगाबादमध्ये शिवसेनेने काढलेल्या मोर्चाला संबोधित करताना मोदी सरकारवर महागाईवर टिकास्त्र सोडले. महागाई ही राष्ट्रीय समस्या असल्याचे म्हणाले. मोदी सरकारने १०० दिवसांत महागाई कमी करण्याचे आश्वासन दिले होते त्याचे काय झाले? अशी विचारणा त्यांनी केली. पेट्रोल अजूनही शंभरीच्या पार असल्याचे सांगत त्यांनी पेट्रोलचे दर ५० रुपयांनी कमी करावेत मग राज्य सरकार दर कमी करण्याबाबत विचार करेल असे ते म्हणाले.

केंद्रीय तपास संस्थांच्या माध्यमातून महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांना धमकवण्यासाठी कारस्थाने सुरु असल्याचा आरोप त्यांनी केला. मात्र, त्यांनी कितीही कारस्थाने केली, तरी आम्ही आपल्या छाताडावर बसून पुढे जाऊ असे संजय राऊत म्हणाले. दरम्यान, शिवसेनेने काढलेल्या महागाई विरोधातील मोर्चाला चांगलाच प्रतिसाद लाभल्याचे दिसून आले. या मोर्चामध्ये महिलांचा मोठ्या प्रमाणात समावेश होता.

भाजपकडून लढण्‍यासाठी नेहमी ‘भाडोत्री’ चा वापर

शिवसेना कामगारांचा पक्ष आहे. बिल्‍डर आणि शेटजींचा पक्ष नाही. कामगारांच्या घामाचा तिरस्‍कार करणारे आज एसटीचा संप चिघळवण्याचे काम करत आहेत. भाजपकडे लढण्यासाठी स्‍वत:चं हत्‍यार नाही ते नेहमी ‘भाडोत्री’ चा वापर करतात. श्रमिकांची डोकी भडकवण्याचं काम भाजपकडून सुरू आहे, असा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला. महागाईविरोधात संजय राऊत यांच्या नेतृत्‍वाखाली औरंगाबादमध्ये मोर्चाचे आयोजन केले आहे. त्‍या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

सरकार एसटी कर्मचाऱ्यांशी चर्चेसाठी तयार आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी राज ठाकरेंची भेट घेतली. यावर पत्रकारांनी विचारलेल्‍या प्रश्नावर एसटीचा संप मिटावा असं राज ठाकरेंना वाटत असेल तर ते स्‍वागतार्ह आहे, असेही ते म्‍हणाले. महागाईविरोधातील मोर्चाला मनसेचा विरोध करत असल्‍याच्या पार्श्वभूमीवर महागाईशी सामना करण्यासाठी मनेसला कुणाकडून तरी अनुदान मिळत असेल, असा टोलाही त्‍यांनी लगावला.

Back to top button