कोल्हापूर विधानपरिषद निवडणूक : शौमिका महाडिक की राहुल आवाडे | पुढारी

कोल्हापूर विधानपरिषद निवडणूक : शौमिका महाडिक की राहुल आवाडे

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर विधानपरिषद निवडणूक : विधानपरिषद स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील निवडणुकीत उमेदवार निश्चित करण्याचे अधिकार भाजपचे प्रदेश अध्यक्ष आ. चंद्रकांत पाटील यांना देण्याचा निर्णय गुरुवारी भारतीय जनता पक्ष व सहकारी पक्षाच्या प्रमुखांच्या बैठकीत घेण्यात आला. कोल्हापुरातील एका हॉटेलमध्ये ही बैठक झाली. दरम्यान, उमेदवारांच्या नावाबाबत जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शौमिका महाडिक व जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे यांची नावे पुढे आल्याचे समजते. बैठकीस जनसुराज्य शक्ती पक्षाचे संस्थापक आ. विनय कोरे उपस्थित होते.

विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी आता हालचाली गतिमान होऊ लागल्या आहेत. यावेळी काँग्रेस व भारतीय जनता पक्ष अशी लढत असणार आहे. काँग्रेसकडून पालकमंत्री सतेज पाटील यांची उमेदवारी निश्चित आहे. त्यांनी प्रचारदेखील सुरू केला आहे. भारतीय जनता पक्षाच्या वतीने या निवडणुकीच्या नियोजनासाठी तसेच उमेदवारांच्या नावावर चर्चा करण्यासाठी गुरुवारी सायंकाळी बैठक घेण्यात आली. बैठकीस भाजपचे प्रदेश अध्यक्ष आ. चंद्रकांत पाटील यांच्यासह आ. प्रकाश आवाडे, आ. विनय कोरे, माजी खासदार धनंजय महाडिक, माजी आमदार सुरेश हाळवणकर, अमल महाडिक आदी उपस्थित होते.

विधानपरिषदेची आगामी निवडणूक ताकदीने लढविण्याबाबत या बैठकीत चर्चा झाली. मतदारांच्या संख्याबळावर सविस्तर चर्चा झाली. संख्याबळाची माहिती घेतल्यानंतर या निवडणुकीत भाजपचा विजय निश्चित असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे सूक्ष्म नियोजन करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. यावेळी उमेदवारांच्या नावाबाबत चर्चाही झाली. सुरुवातीला भाजपकडून माजी आमदार महादेवराव महाडिक, सुरेश हाळवणकर, शौमिका महाडिक व राहुल आवाडे यांची नावे चर्चेत होती. त्यामध्ये भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांच्या नावाची आज भर पडली. असे असले तरी उमेदवारीसाठी शौमिका महाडिक व राहुल आवाडे यांची नावे आघाडीवर असल्याचे कळते. अखेर उमेदवार निवडीचे अधिकार आ. चंद्रकांत पाटील यांना देण्याचा निर्णय गुरुवारच्या बैठकीत घेण्यात आला. उमेदवार निवडीसंदर्भात दोन दिवसांत पुन्हा बैठक घेण्याचेही यावेळी ठरविण्यात आले.

कोल्हापूर विधानपरिषद निवडणूक : आ. कोरे, आ. आवाडे भाजपसोबतच

आ. विनय कोरे व आ. प्रकाश आवाडे हे राज्याच्या राजकारणात भाजपसोबत आहेत. जिल्हा परिषदेतही ते भाजपसोबत आहेत. त्यामुळे विधानपरिषद निवडणुकीतही ते भाजपसोबतच राहणार आहेत, असे भाजपचे प्रदेश अध्यक्ष आ. चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. स्थानिक पातळीवर उमेदवारांच्या नावाची चर्चा झाल्यानंतर मुंबईत नावावर शिक्कामोर्तब केला जातो. अंतिम मान्यता दिल्लीहून घ्यावी लागते. त्यामुळे दोन दिवसांत आम्ही उमेदवार जाहीर करू. संख्याबळ पाहता या निवडणुकीत भाजप निश्चित विजयी होईल, असेही ते म्हणाले.

हेही वाचा : 

Back to top button