Black Panther: कुडाळ वनविभागाकडून गोवेरीत ब्लॅक पँथरला केले जेरबंद | पुढारी

Black Panther: कुडाळ वनविभागाकडून गोवेरीत ब्लॅक पँथरला केले जेरबंद

कुडाळ : पुढारी वृत्तसेवा

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यात गोवेरी येथील तुकाराम राऊळ यांच्या आंबा,काजू बागेत सिंचनासाठी बांधलेल्या सात ते आठ फूट खोल पाण्याच्या टाकीमध्ये ब्लॅक पँथर (Black Panther) (काळा बिबट) आढळून आला. याची माहिती कुडाळ वनविभागाला मिळताच कुडाळ वनपरिक्षेत्र अधिकारी अमृत शिंदे यांच्या नेतृत्वाखालील वनविभागाच्या पथकाने दिड ते दोन वर्षाच्या ब्लॅक पँथरला टाकीमध्ये पिंजरा सोडत गुरूवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास अलगत जेरबंद करून बाहेर काढले. त्यानंतर ब्लॅक पँथरची वैद्यकीय तपासणी करत त्याला नैसर्गिक अधिवासात सोडुन देण्यासाठी वनविभागाचे पथक रवाना झाले. ब्लॅक पँथरला सिंधुदुर्गात जेरबंद करण्याची ही पहिलीच घटना असल्याने ही बातमी वार्‍यासारखी पसरताच ब्लॅक पँथरला पाहण्यासाठी कुडाळ वनविभागाकडे नागरीकांनी मोठी गर्दी केली होती. कुडाळ प्रांताधिकारी सौ. वंदना खरमाळे यांनीही या दुर्मिळ ब्लँक पँथरचे दर्शन घेतले.

जिल्ह्याची जैवविविधता वैभवशाली – डॉ. कोळी

आपण जिल्ह्यात अनेक वन्यप्राणी पाहिले आहेत परंतु गोवेरीत सापडलेल्या या बँक पँथरमुळे जिल्ह्यातील जैवविविधता अद्यापही अबाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे. हा ब्लँक पँथर ताडोबा राष्ट्रीय उद्यान,जिल्ह्यात तिलारी,आंबोली यासारख्या घनदाट जंगलात सापडतो मात्र तेंडोली सारख्या कमी जंगलाच्या ठिकाणी मिळालेल्या या ब्लँक पँथरमुळे जिल्ह्यात अशा दुर्मिळ वन्य प्राण्यांसाठी सुरक्षित व पोषक वातावरण असून येथील जैवविविधता वैभवशाली असल्याचे स्पष्ट झाले आहे. आता अशा दुर्मिळ प्राण्यांचे संरक्षण करण्यासाठी संवर्धन व संरक्षण करण्याची आवश्यकता निर्माण झाली असल्याचे वन्यजीव अभ्यासक डॉ. योगेश कोळी यांनी सांगितले.

Back to top button