शिवप्रताप दिन विशेष : शिवाजी महाराज यांची वाघनखे आहेत कुठे? | पुढारी

शिवप्रताप दिन विशेष : शिवाजी महाराज यांची वाघनखे आहेत कुठे?

कोल्हापूर, पुढारी ऑनलाईन

छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा वध ज्या वाघनखाने केला ती वाघनखे आहेत कुठे? असा प्रश्न अनेकांना पडतो. कुणी सांगते की,  ती वाघनखे इंग्लंडच्या म्युझियममध्ये आहेत तर कुणी म्हणते ती अजूनही भारतात आहेत. या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळविण्याचा प्रयत्न केला आहे शिवप्रताप दिनानिमित्त पुढारी ऑनलाईनने. इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांच्याशी याबाबत आमच्या प्रतिनिधी स्नेहा मांगूरकर यांनी केलेली ही खास बातचीत…

इंद्रजित सावंत म्हणाले, अफजलखान महमंदशहा हा मध्ययुगातील सेनापती होता. त्याने औरंगजेबासारख्याचा धुरंदर सेनापतीचा पराभव केला होता. त्याला अपराजित सेनापती मानले जात होते. अशा सेनापतीचा प्रतापगडच्या युद्धात वध केला. तोच दिवस म्हणजे शिवप्रतापदिन होय.

शिवप्रताप दिन म्हणजे…

अफजलखान प्रतापगडच्या पायथ्याला तळ ठोकून बसल्यानंतर त्याची आणि शिवाजी महाराजांची भेट ठरली. प्रतापगडाच्या पायथ्याला या दोघांची सशस्त्र भेट झाली होती. अफजलखानाची इतिहासातील वर्णन पाहता तो दुसरा दुर्योधनच आहे, अशी त्याची वर्णने आहेत. अफजलखानाचे समकालीन चित्र उपलब्ध आहे. त्यातून त्याचे भयानक आणि धिप्पाडपण लक्षात येते. त्याला सह्याद्रीच्या सिंहाने जायबंदी करून त्याचा वध केला. अफजलखानाला मारल्यानंतर तो सोबत घेऊन आलेल्या सैन्याचा फडशा आपल्या युद्धनीतीने शिवाजी महाराजांनी पाडला. हे प्रतापगडचे युद्ध हे जगविख्यात आहे. ते शिवाजी महाराजांनी जिंकले. त्यामुळे त्यांचे नाव जगभर झाले. अफजलखान जगविख्यात होता, त्याला शिवाजी महाराजांनी मारले हा बोलबाला झाला. त्यामुळे आपल्यासाठी हा खूप महत्त्वाचा दिवस आहे.

वाघनख खरंच वाघाच्या नखांपासून बनते?

लोकांची कल्पना असते की, वाघनखे म्हणजे वाघाच्‍या नखांपासून तयार केले आहे; पण वाघाची नखे या शस्त्रापेक्षा खूप मोठी असतात. त्याचा पंजा मोठा असतो. त्या वाघनखांची प्रेरणा घेऊन मानवाने एक शस्त्र तयार केले. या वाघनखांचे उल्लेख ऋग्वेदापासून आढळतात. हे जगातील सर्वात घातक शस्त्र आहे. ते हातात सहज बसते. त्यामुळे शत्रूला ते दिसत नाही. सगळ्यात लहान आणि सगळ्यात घातक शस्त्र म्हणजे वाघनख. याचा उल्लेख जेधे शकावली, सभासद बखर आणि अन्य समकालीन साधनांमध्ये आढळतात. अज्ञानदासाच्या पोवाड्यातही याचा उल्लेख आढळतो. अफजलखान आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची भेट अगदी जवळजवळ झाली. अलिंगन दिल्यानंतर त्याने छत्रपती शिवाजी महाराजांना डाव्या काखेत दाबून धरले. अशा वेळी त्यातून सुटायचे असेल तर हल्ला केल्याशिवाय पर्याय नव्हता. तलवार, पटा असेल तर लांबून वार करावा लागतो. मात्र, वाघनख अतिशय घातक शस्त्र आहे. महाराजांनी शस्त्रांचा सखोल अभ्यास केला होता. त्यांनी तलवार, भाल्यात बदल केला, तसा वाघनखांचाही अभ्यास केला असावा.

वाघनख्‍यांचा उल्लेख

कान्होजी जेधे घराण्याचा जेधे शकावली आणि जेधे करिना यामध्‍ये अफजलखानाशी झालेल्या लढाईचा उल्लेख आहे. त्यांच्या नोंदी होत्या, अज्ञानदासाच्या पोवाड्यात, डचांच्या पत्रांत त्याचा उल्लेख आहे. मनुचीने लिहिलेल्या पत्रात वाघनख वापरल्याचा उल्लेख आहे. वाघनखाने माणूस मरत नाही; पण तो गंभीर जखमी होतो. हत्ती कितीही मोठा असला तरी अंकुशामुळे हत्ती नियंत्रणात येतो. तसेच वाघनखाचे आहे. ते खूप ताकदीने ओढले तसे वाघाच्या हल्ल्याप्रमाणे पोटावरील चरबी बाहेर येते. त्यामुळे तो गंभीर जायबंदी होतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानावर वार करण्यासाठी याचा वापर केला. याचा उल्लेख सहा ते सात साधनांमध्ये आहे. नंतरच्या काळात मराठ्यांकडे वाघनखे होती, याचे उल्लेख आढळतात. रामचंद्रपंत अमात्य यांच्या अस्सल वाटणीपत्रात वाघनखांचा उल्लेख आहे. तसेच सातारा छत्रपतींच्या शिलेखान्यात, न्यू पॅलेसच्या शहाजी म्युझियममध्ये वाघनखे आहेत. शिवकाळापासून त्यांची परंपरा तयार झाली.

शिवाजी महाराज यांची वाघनखे 

छत्रपती शिवाजी महाराजांचे वाघनखे कुठे आहेत?, याचा शोध आपल्याला अजून लागलेला नाही. लंडनमध्ये व्हिक्टोरिया अल्बर्ट म्युझियममध्ये वाघनख आहे ते शिवाजी महाराजांचे आहे, अशी वदंता आहे. ते वाघनख मराठ्यांचा आद्य इतिहासकार आणि साताऱ्याचा रेसिडंट ग्रँड डफ याने म्युझियमला भेट दिलेले आहे. प्रतापसिह महाराज आणि डफची मैत्री होती. या मैत्रीतूनच हे वाघनख डफला दिले. त्याने ते आपल्या मुलाकडे आणि मुलाने त्याच्या मुलाकडे म्हणजे दुसऱ्या ग्रँड डफकडे दिले. त्याने ते वाघनख म्युझियमला दिले. त्या म्युझियममध्ये असलेले वाघनख शिवाजी महाराजांचे आहे, असे म्हटले जाते त्यात तथ्य नाही. ते सातारच्या संग्रहातील असू शकते. सातारकर छत्रपतींकडे शिवाजी महाराजांची भवानी तलवार, हिरा, गळ्यातील भवानीचा टाक आहे. त्यात दोन वाघनखे १९१९ पर्यंत असल्याचा उल्लेख आहे. आज ती कुठे आहेत हे माहीत नाहीत, कदाचित ती त्यांच्या खासगी संग्रहात असतील. जी वाघनखे म्युझियममध्ये आहेत ती नक्कीच शिवाजी महाराजांची नाहीत. ती शिवाजी महाराजांची नक्कीच दिली नसतील, कारण ती परंपरा असते. करवीर छत्रपतींच्या संग्रहात असलेली वाघनखे हीसुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांची असू शकतील. त्याचा अभ्यास झाला पाहिजे, अशी अपेक्षाही इंद्रजित सावंत यांनी या वेळी व्‍यक्‍त केली.

हेही वाचलं का ? 

 

Back to top button