Santosh Jagtap Bodygaurd Death : संतोष जगतापच्या अंगरक्षकाचाही मृत्यू, मुंबईत उपचारादरम्यान निधन | पुढारी

Santosh Jagtap Bodygaurd Death : संतोष जगतापच्या अंगरक्षकाचाही मृत्यू, मुंबईत उपचारादरम्यान निधन

यवत/लोणी काळभोर : पुढारी वृत्तसेवा

उरुळी कांचन येथे दि. २२ ऑक्टोबर रोजी भरदिवसा झालेल्या गोळीबारात संतोष जगताप यांचा जखमी झालेला अंगरक्षक मोनुसिंग (वय 35, मुळगाव लखनौ) याचा मुंबईत उपचारादरम्यान बुधवारी पहाटे मृत्यू झाला. या वृत्ताला संतोष जगताप यांच्या कुटुंबियांनी दुजोरा दिला आहे. (Santosh Jagtap Bodygaurd death)

दरम्यान उरुळी कांचनला झालेल्या गोळीबारात यापूर्वीच संतोष जगताप स्वागत खैरे यांचा मृत्यू झाला होता. अंगरक्षक मोनुसिंग यांच्या मृत्यूनंतर आता या गोळीबारात मृत्यू झालेल्याची संख्या तीनवर पोहचली आहे

Santosh Jagtap Bodygaurd Death : आत्तापर्यंत लोणी काळभोर पोलिसांकडून एकूण पाच जणांना अटक

संतोष जगताप खून प्रकरणी आत्तापर्यंत लोणी काळभोर पोलिसांनी एकूण पाच जणांना अटक केली आहे. यात महादेव आदलिंगे, पवन मिसाळ, उमेश सोनवणे, अभिजीत यादव आणि आकाश वाघमोडे या संशयीत आरोपींचा समावेश आहे.

संतोष जगताप खून प्रकरणातील मुख्य सूत्रधार अटकेत

उरुळी कांचन येथे संतोष जगताप याच्यावर गोळीबार करुन त्याचा खून केल्याच्या प्रकरणातील मुख्य सुत्रधार उमेश सोपान सोनवणे (रा.राहू ता.दौंड) यास लोणी काळभोर पोलिसांनी अटक केली. त्यास न्यायालयाने दहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. याबाबतची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी दिली.

पुणे-सोलापूर महामार्गावर उरुळी कांचन येथे वाळू व्यावसायिक संतोष जगताप याच्यावर गोळीबार करण्यात आला होता. यात जगताप जागीच ठार झाला, तर दोन अंगरक्षक गंभीर जखमी झाले होते.

प्रत्युत्तरादाखल जगताप याच्या अंगरक्षकांनी गोळीबार केला. त्यात एक हल्लेखोर जागीच ठार झाला तर अन्य पळून गेले होते.

त्यापैकी पवन मिसाळ व महादेव आदलिंग या दोघांना पळसदेव (ता. इंदापूर) येथून अटक करण्यात आली होती.

त्यांच्याकडून मिळालेल्या माहिती वरून या हल्ल्यात मुख्य सूत्रधार उमेश सोनवणे असल्याचे निष्पन्न झाले होते.

परंतु तो हाती लागला नव्हता. यावर वरिष्ठ पोलीस निरीक्षक मोकाशी यांनी सोनवणे याला पकडण्यासाठी तपास पथकास सूचना दिल्या.

Back to top button