कुरुंदवाड : बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीत पोलिसांनी धरला पारंपरिक वाद्यांवर ठेका | पुढारी

कुरुंदवाड : बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीत पोलिसांनी धरला पारंपरिक वाद्यांवर ठेका

कुरुंदवाड; पुढारी वृत्तसेवा : अनंत चतुर्थीच्या गणेश विसर्जनानंतर तिसऱ्या दिवशी कुरुंदवाड पोलीस ठाण्याच्या बाप्पाची विसर्जन मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणुकीत विविध वाद्यांच्या तालावर पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ठेका धरत मनसोक्त डान्स केल्याचे चित्र पाहायला मिळाले आहे.

संबधित बातम्या

दरम्यान जिल्हा पोलीस प्रमुख महेंद्र पंडित यांनी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना गणवेशात मिरवणुकीत सहभागी होऊ नये असे आवाहन केले होते. त्यानुसार पोलिसांनी नेहरू शर्ट, फेटा असा पोशाख परिधान करून मिरवणुकीत सहभागी झाले होते.

कुरुंदवाड शहर व परिसरात गेल्या दहा ते बारा दिवसापासून भाविकांना गणेशोत्सवाचा आनंद भयमुक्त आणि मनसोक्त लुटता यावा यासाठी पोलीस प्रशासनाने डोळ्यात तेल घालून नागरिकांना सेवा दिली. अनंत चतुर्थीनंतर दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर गणपती विसर्जनासाठी झांज पथक, ढोल ताशा, धनगरी ढोल, हलगी खेताळच्या वाद्याच्या गजरात मिरवणूक काढली होती. मिरवणुकीत सपोनि फडणीस, पोलीस कॉन्स्टेबल शहाजी फोंडे यांनी धनगरी ढोल वादनातील शिडीचा ताल घुमवत परिसर दणाणून सोडला होता.

या मिरवणुकीत पोलीस ठाण्यातील सर्वच पोलिसांनी नाचण्याचा आनंद घेत वाद्यांच्या तालावर ठेका धरला होता. विशेष म्हणजे, अगदी सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस, सागर पवार ते पोलीस शिपायापर्यंत साऱ्यांनीच फेटा आणि पारंपरिक वेशात आपल्या कामाचा ताणतणाव विसरत शिवतीर्थाजवळ मनसोक्त ठेका धरल्याचं यावेळी बघायला मिळाले. वाद्यांच्या तालावर ठेका धरत मिरवणुकीचा आनंद द्विगुणित केला. कुरुंदवाड शहरातील पोलीस प्रशासनाच्या बाप्पाची मिरवणूक पाहून नागरिक अवाक होऊन सहभागी होत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. ठिकठिकाणी मिरवणुकीचे स्वागत ही करण्यात आले.

हेही वाचा : 

Back to top button