Khadakwasla chain : खडकवासला साखळी प्रकल्पात जोरदार पाऊस

Khadakwasla chain  : खडकवासला साखळी प्रकल्पात जोरदार पाऊस

पुणे; पुढारी वृत्तसेवा : खडकवासला धरणसाखळी प्रकल्पातील चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस कोसळत आहे, त्यामुळे शुक्रवारी रात्रीपासून खडकवासला धरणातून मुठा नदीत पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. शनिवारी सायंकाळी पाच वाजल्यापासून या धरणातून मुठा नदीत 2 हजार 140 क्युसेकने पाणी सोडण्यात आले. चारही धरणांत मिळून 97 टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. शहराला पाणीपुरवठा करणार्‍या टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला या चारही धरणांच्या परिसरात गेल्या काही दिवसांपासून पाऊस हजेरी लावत आहे.

सध्या या चारही धरणांत मिळून एकूण 28.38 अब्ज घनफूट (टीएमसी) पाणीसाठा जमा झाला आहे. वरसगाव, पानशेत आणि खडकवासला ही तिन्ही धरणे 100 टक्के भरली आहेत, तर टेमघर धरण 79 टक्के भरले आहे. वरसगाव धरणातून 450 क्युसेकने, तर खडकवासला धरणातून 2140 क्युसेकने नदीत पाणी सोडण्यात येत आहे.

शुक्रवारी रात्रीपासून शनिवारी सकाळपर्यंत टेमघर धरणक्षेत्रात 55 मिलिमीटर, वरसगाव धरण परिसरात 43 मि. मी., पानशेत धरण परिसरात 44 मि. मी., तर खडकवासला धरणक्षेत्रात 33 मि. मी. पावसाची नोंद करण्यात आली. दिवसभरात खडकवासला धरण परिसरात 1 मि. मी. पावसाची नोंद झाली, तर उर्वरित तिन्ही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने विश्रांती घेतली, असे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news