रावणगाव : प्रदूषित पाण्यामुळे माशांची मरणयात्रा | पुढारी

रावणगाव : प्रदूषित पाण्यामुळे माशांची मरणयात्रा

रावणगाव(पुणे); पुढारी वृत्तसेवा : मळद (ता. दौंड) येथील तलावात कुरकुंभ एमआयडीसीतील केमिकलयुक्त प्रदूषित पाणी पावसाच्या पाण्याबरोबर वाहून आले. यामुळे अनेक मासे मृत्युमुखी पडल्याची घटना शनिवारी (दि. 30) उघडकीस आली. मळद येथील तलाव अनेक दिवसांपासून पुरेशा पावसाअभावी कोरडा पडत चालला होता. मागील आठवडाभरापासून या परिसरात मोठा पाऊस होत आहे.

शुक्रवारी (दि. 29) सायंकाळी कुरकुंभ व पांढरेवाडी परिसरात सायंकाळी जोरदार पाऊस झाल्याने पावसाच्या पाण्याबरोबर कुरकुंभ एमआयडीसीतील अनेक कंपन्यांनी नाल्यांमधून सोडलेले केमिकलयुक्त पाणी ओढ्याच्या पात्राद्वारे तलावात आले. या तलावात असणारे चिलापी, राहू, कटला व मरळ या माशांना केमिकलचे पाणी सहन न झाल्याने यातील अनेक मासे मृत्युमुखी पडून पाण्यावर तरंगताना दिसून आले.

तलावाची पाणीपातळी कमी झाल्याने तलावात केमिकलयुक्त पाण्याचा शिरकाव जास्त झाला. यामुळे या परिसरातील पाण्याचे स्रोत बिघडले असून, नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे. ग्रामस्थांबरोबर जनावरांनाही येथील तलवातील पाण्याने धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे तातडीने या तलावात येणारे केमिकलयुक्त पाणी बंद करण्याची मागणी येथील ग्रामस्थ जब्बार सय्यद यांनी दै. ‘पुढारी’शी बोलताना केली.

हेही वाचा

फडणवीस-पवार रात्री ‘वर्षा’वर मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

कोल्हापूर : लोकसहभागातून वनराई बंधारे

परदेशवारी जनतेच्या पैशांवर नको! : आदित्य ठाकरे

Back to top button