पवन मावळात दोन हजार हेक्टरवर भात लागवड | पुढारी

पवन मावळात दोन हजार हेक्टरवर भात लागवड

वडगाव मावळ(पुणे); पुढारी वृत्तसेवा : पवन मावळात दोन हजार हेक्टरवर भात लागवड करण्यात आली आहे. उत्पन्न वाढीसाठी मावळ तालुका कृषी अधिकारी व मंडळ कृषी अधिकारी काले कॉलनी यांच्या वतीने पवन मावळ भागातील 10 हेक्टर क्षेत्रावर व 25 लाभार्थी शेतकर्‍यांच्या शेतात/चारसूत्री भात लागवड प्रकल्पांतर्गत  झिंक सल्फेट व कामगंध सापळे वाटप करून मार्गदर्शन
करण्यात आले.

चारसूत्री लागवडीवर भर

मळवंडी ठुले येथे कृषी विभागाकडून चारसूत्री पीक प्रात्यक्षिक प्रकल्प राबविण्यात येत आहे. भात प्रकल्प हा चारसूत्री लागवड पद्धतीवर आधारित असून, त्यामध्ये स्थानिक शेतकर्‍यांच्या माध्यमातून लाभार्थी शेतकर्‍यांची निवड करण्यात आली. त्यांच्या क्षेत्रावर हा प्रकल्प राबविला जात असून चारसूत्री प्रकल्पातील प्रत्येक शेतकर्‍याच्या शेतावर एक एकर क्षेत्रावर प्रात्यक्षिक घेण्यात
आले आहे.

भात प्रात्यक्षिक प्लॉटला 30 कामगंध सापळे

शेेतकर्‍यांनी भात बियाण्यास बीजप्रक्रिया करून गादीवाफ्यावर रोपवाटिका करून दोरीच्या सहाय्याने 15 बाय 25 से.मी. अंतरावर भात लागवड केल्या आहेत. प्रकल्पांतर्गत लाभार्थी शेतकर्‍यांना कृषी विभागाकडून आझेटोबॅक्टर, पीएसबी, निमआर्क, ट्रायकोड्रामा, बांधावर लागवडीसाठी तूर बियाणे, झिंक सल्फेट, भात प्रात्यक्षिक प्लॉटला 30 कामगंध देण्यात आले आहे, असे कृषी सहायक विकास गोसावी
यांनी सांगितले.
चारसूत्री पद्धतीत भात रोपे कमी लागत असून भात लावणीस कमी वेळ लागतो व बियाणे कमी लागल्यामुळे बियाणे खर्च ही कमी येतो. युरिया ब्रिकेट खतामुळे भाताच्या उत्पादनात 2 ते 3 पट वाढ होणार असून कृषी विभागाच्या नवनवीन तंत्रज्ञानाचा आम्हा शेतकर्‍याना निश्चितच फायदा होत आहे.
– दत्तात्रय तोंडे, 
शेतकरी, मळवंडी ठुले
सुधारित तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादन वाढविणे, आधुनिक तंत्रज्ञान प्रगतशील शेतकर्‍यांच्या माध्यमातून प्रचार व प्रसार करणे, उत्पादन खर्च कमी करणे, भात चारसूत्री पद्धत क्षेत्र वाढविणे हा प्रकल्प राबविण्याचा मुख्य उद्देश आहे.
– विकास गोसावी, 
कृषी सहायक, मळवंडी ठुले 
हेही वाचा

Back to top button