

पन्हाळा, पुढारी वृत्तसेवा : नणुंद्रे (ता. पन्हाळा) येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी आरोपीस जागा उपलब्ध करून दिल्याने कोल्हापूर नागाळा पार्क येथील अरोमा कॅफेचा मालक समाधान बाबुराव यादव (वय 30 रा. धरणीमाता हौसिंग सोसायटी 51/1, विचारे माळ कोल्हापूर) तसेच कसबा बावडा येथील किसान हॉटेल व लॉजिंगचा व्यवस्थापक अनिल लक्ष्मण पाटील (24 रा. कसबा बावडा) यांना पोलिसांनी शुक्रवारी अटक केल्याची माहिती अप्पर पोलिस अधीक्षक जयश्री देसाई व शाहूवाडी विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी जयकुमार सूर्यवंशी यांनी दिली.
नणुंद्रे येथील भूषण शंकर जाधव (23) याने पीडितेस 2020 ते फेब्रुवारी 2023 दरम्यान हॉटेल किसान व लॉजिंग बोर्डिंग तसेच अरोमा कॅफे येथे जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवून तिचे मोबाईलवर फोटो ठेवल्याची तक्रार पीडितेने केली होती. त्यानंतर पोलिसांनी आरोपी जाधववर 'पोक्सो'अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.