कोल्हापूर : डेंग्यूचा डंख जीवावर | पुढारी

कोल्हापूर : डेंग्यूचा डंख जीवावर

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : शहरात पुन्हा डेंग्यूची तीव्रता वाढली आहे. त्यामुळे कोल्हापूरकर हैराण झाले आहेत. अंगात फणफणणारा ताप, अंगदुखी, सांधेदुखी, थंडी वाजून ताप येणे, अशी लक्षणे रुग्णाला दिसू लागतात. कसबा बावडा येथील महाविद्यालयीन विद्यार्थी ज्योतिरादित्य नाईक याचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे या प्रश्नाची तीव्रता आणखी वाढली असून, डेंग्यूच्या अळ्या नष्ट करण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाबरोबरच इतरांनीही याबाबत काळजी घेतली पाहिजे. जिल्ह्यात गेल्या सहा महिन्यांत 3 जणांचा डेंग्यूसद़ृश आजाराने मृत्यू झाला आहे.

कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यातही डेंग्यूचा फैलाव वाढला आहे. जानेवारी ते 31 जुलै 2023 अखेर कोल्हापूर शहरात उपलब्ध आकडेवारीनुसार, 30 रुग्णांची नोंद झाली आहे. 31 जुलैपर्यंत कोणीही या आजाराने दगावलेले नाही. महापालिकेने या काळात विशेष मोहीम घेऊन डेंग्यूच्या अळ्या नष्ट करण्यास सुरुवात केली होती. तरीदेखील सुमारे 24 रुग्ण शहरात आढळले आहेत. ही केवळ सरकारी आकडेवारी आहे. प्रत्यक्षात खासगी रुग्णालयांतही ताप, थंडी, अंगदुखी, सांधेदुखी या आजाराने त्रस्त असणार्‍या रुग्णांचे प्रमाण जास्त होते.

त्यामुळे डेंग्यूच्या आजाराची तीव्रता जुलै महिन्यात मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसून आले आहे. सरकारी आकड्यांपेक्षा किती तरी जादा पटीने रुग्ण आढळल्याचे वैद्यकीय क्षेत्रातील सूत्रांचे म्हणणे आहे. जिल्ह्यात जानेवारी 2023 ते जुलै 2023 या काळात 301 डेंग्यूच्या रुग्णांची नोंद आढळून आली. 12 तालुक्यांतील 76 प्राथमिक आरोग्य केंद्रांतून पाहणी केल्यानंतर ही आकडेवारी समोर आली आहे. त्यामुळे डेंग्यूबाबत आरोग्य यंत्रणाही आता खडबडून जागी झाली असून, त्यांनी विविध उपाययोजना करण्यावर भर दिला आहे. जिल्हा परिषदेकडे याबाबतची आकडेवारी उपलब्ध आहे.

कसबा बावड्यातील विद्यार्थ्याचा मृत्यू

दरम्यान, कसबा बावडा येथील ज्योतिरादित्य नाईक (वय 18) या महाविद्यालयीन विद्यार्थ्याचा गुरुवारी डेंग्यूने मृत्यू झाला. त्याला आठ दिवसांपासून ताप येत होता. त्याच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. परंतु, त्याच्या मेंदूमध्ये रक्तस्राव झाल्याने गुरुवारी त्याचा मृत्यू झाला. ज्योतिरादित्य नाईक डॉ. डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात द्वितीय वर्षात शिकत होता. अ‍ॅड. जयसिंह नाईक आणि पोलिस दलातील महिला कर्मचारी पुष्पलता कुंभार-नाईक यांचा ज्योतिरादित्य हा मुलगा होय. त्याच्या अशा मृत्यूने कुटुंबीयांनाही धक्का बसला आहे.

3 वर्षांत 2,166 जणांना डेंग्यू

डेंग्यू, चिकुनगुनिया आदी आजारांचा फैलाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. गेल्या तीन वर्षांत 2,166 डेंग्यू, तर 700 जणांना चिकुनगुनिया झाल्याचे समोर आले आहे.

Back to top button