कोल्हापूर : कासारी धरण क्षेत्रात जुलैमध्ये उच्चांकी पावसाची नोंद

कोल्हापूर : कासारी धरण क्षेत्रात जुलैमध्ये उच्चांकी पावसाची नोंद
Published on
Updated on

विशाळगड; सुभाष पाटील : कासारी धरण पाणलोट क्षेत्रात आजअखेर २ हजार ८८० मिमी पावसाची नोंद झाली आहे. गतवर्षी हा आकडा याच तारखेला २ हजार २८९ इतका होता. पावसाने उशिरा जरी सुरुवात केली असली तरी गेल्या दहा-बारा दिवसांत झालेल्या पावसाने गतवर्षीचा आकडा ओलांडून तब्बल ५९१ मिमी जादा पाऊस झाल्याने कासारी खोऱ्यातील पिण्याच्या पाण्याचा व सिंचनाचा प्रश्न मिटला आहे.

धरणात पाण्याची आवक वाढत असल्याने धरण प्रशासनाने पाण्याचा विसर्ग वाढवून गेले चार दिवस धरणात ८० ते ८३ टक्के इतकाच पाणीसाठा स्थिर ठेवण्यात आला आहे. धरण प्रशासनाने योग्य नियोजन केल्याने पाणीसाठ्यात वाढ व घट होत आहे. जुनपेक्षा जुलैमध्ये उच्चांकी २४०८ मिमी पावसाची नोंद झाल्याची माहिती धरण प्रशासनाने दिली.

शाहूवाडीतील २१ व पन्हाळा तालुक्यातील ४१ गावांना सुजलाम्‌ सुफलाम्‌ करणारे कासारी (गेळवडे) धरण पिण्याच्या पाण्यासाठी व सिंचनासाठी वरदान ठरले आहे. ३० जुलैला ८०.२७ टक्के धरण भरले आहे. गतवर्षी आजच्या तारखेला ६९ टक्के धरण भरले होते. यंदा धरणात गतवर्षीपेक्षा ११ टक्के पाणीसाठा जास्त आहे. तसेच धरण पाणलोट क्षेत्रात १ जूनपासून आजअखेर २८८० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. संभाव्य पूरस्थिती टाळण्यासाठी धरणातून विद्युत गृहातून २५० तर सांडव्यातून ७५० क्‍युसेक असा एकूण १ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग कासारी नदीपात्रात केला जात होता. पावसाचा जोर कमी झाल्याने रविवारी (दि.३०) रोजी विद्युत गृहातून २५० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

कासारी पाणलोट क्षेत्रात गेळवडे या प्रमुख मध्यम प्रकल्पासह कुंभवडे, केसरकरवाडी, पोबरे, पडसाळी व नादांरी हे लघु पाटबंधारे प्रकल्प येतात. गेळवडे हे प्रमुख धरण असून याची पाणी साठवण क्षमता २.७७ टीएमसी आहे. या प्रकल्पाखाली ६२ गावांना उपसा सिंचन कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यामधून पाणी मिळते. उन्हाळ्यात पाणी अडवण्यासाठी नदीवर जागोजागी सुमारे १४ कोल्हापूर पद्धतीचे बंधारे आहेत. सुमारे ९ हजार ४५८ हेक्‍टर क्षेत्र सिंचनाखाली आहे. कासारी (गेळवडे) ३० जुलै अखेर २.२३ टीएमसी भरले आहे. जुनअखेर धरणात १५ टक्के पाणीसाठा होता. पाण्याची पातळी खालावल्याने उपसा बंदीही करण्यात आली होती.  धरणाचा पाणीसाठा २८ जुलै रोजी ८३ टक्के होता. पण संभाव्य पूरपरिस्थिती गंभीर होऊ नये म्हणून सध्या धरणातून पाण्याचा विसर्ग करून तो ८० टक्क्यांवर आणला आहे.

कासारी धरण क्षेत्रात यंदाचा व गतवर्षीचा पाऊस व धरण पाणीसाठा असा : 

कालावधी            मिमी       टक्के          गतवर्षी       टक्के
१ ते ३० जून           ४७२        २२.६६        ५७४           ३३
१ ते ३० जुलै           २४०८      ५७.६१        १७१५          ३६
एकूण                   २८८०       ८०.२७       २२८९          ६९

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news