कोल्हापूर : ए. एस. ट्रेडर्सच्या म्होरक्यासह संचालक दुबईला पसार | पुढारी

कोल्हापूर : ए. एस. ट्रेडर्सच्या म्होरक्यासह संचालक दुबईला पसार

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : दामदुप्पट परताव्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांना कोट्यवधीचा गंडा घालून पसार झालेल्या बहुचर्चित ए. एस. ट्रेडर्स अँड डेव्हलपर्स कंपनीच्या म्होरक्यासह संचालकांचा हायकोर्टाने अटकपूर्व जामीन फेटाळताच संशयितांनी 24 जुलैपूर्वी दुबईला पलायन केल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे, असे पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी सांगितले. साखळीतील एजंटांची यादी संकलित करून संबंधितांच्या अटकेच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

कंपनीचा प्रमुख लोहितसिंग सुभेदार, दीपक मोहिते, अमित शिंदे, अभिजित शेळके, विजय पाटील, संतोष कुंभारसह गुन्हा दाखल झालेल्या 28 संचालकांसह साखळीतील एजंटांच्या मालमत्तांचा शोध घेण्यात येत आहे. संबंधित मालमत्तांवर टाच आणण्याची प्रक्रियाही वेगाने राबविण्यात येत आहे. सर्वच संशयितांच्या बँक खात्यांवर झालेल्या आर्थिक उलाढालीची तपशीलवार माहितीही मागविण्यात येत आहे, असेही ते म्हणाले.

ए. एस. ट्रेडर्स अँड डेव्हलपर्सविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल होताच काही संचालकांनी दुबई गाठली होती. उर्वरित संचालक मुंबई, पुण्यासह अन्य शहरांत घुटमळत होते. अटकपूर्व जामिनासाठी त्यांनी हायकोर्टात धाव घेतली होती. मात्र, जामीन मिळणार नाही, ही शक्यता गृहीत धरून संशयितांनी दुबईला पलायन केल्याची माहिती पुढे आली आहे. संशयितांना अटक करण्यासाठी आर्थिक गुन्हे शाखेची यंत्रणा कार्यरत असल्याचेही त्यांनी सांगितले.

जागा खरेदी, चित्रपटनिर्मितीवर कोट्यवधीची गुंतवणूक

एक लाखाच्या गुंतवणुकीपोटी महिन्याला 8 टक्के परतावा देण्याच्या आमिषाने सुमारे 600 जणांची सुमारे 30 कोटींची फसवणूक करणार्‍या संग्राम भारत नाईकसह चारही संशयितांनी जागा खरेदीसह चित्रपटनिर्मितीवर मोठ्याप्रमाणात गुंतवणूक केल्याची माहिती चौकशीतून पुढे आली आहे, असेही पोलिस अधीक्षक पंडित यांनी सांगितले. परताव्याच्या आमिषाने गुंतवणूकदारांनी तक्रार अर्ज दाखल करताचा प्रथम संशयितांना ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

निवृत्तीवेतनाची 50 लाखांची रक्कम गुंतविली!

वेल्थ शेअर्स फर्मचा प्रमुख संग्राम नाईक, विनायक भोगण, रणजित नाईकसह स्वाती नाईक यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल होताच शुक्रवारी रात्री उशिरा निवृत्त अधिकार्‍याने आपल्याशी संपर्क साधला. आपणही निवृत्तीवेतनाची 50 लाखांची रक्कम संबंधित फर्ममध्ये गुंतविल्याचे सांगताच, मला धक्का बसला, असेही पोलिस अधीक्षकांनी सांगितले. उद्योग-व्यावसायिकांसह व्यापारी, विशेषकरून निवृत्त अधिकारी, कर्मचार्‍यांनी अशा फसव्या कंपन्यांपासून सावध राहावे, असे आवाहनही पोलिस अधीक्षक पंडित यांनी केले आहे.

Back to top button