कोल्हापूर : कडवी धरण ओव्हरफ्लो | पुढारी

कोल्हापूर : कडवी धरण ओव्हरफ्लो

विशाळगड; सुभाष पाटील : कडवी धरणाच्या सांडव्यातून शुक्रवारी सायंकाळी पाण्याच्या गुळण्या पडत होत्या. पावसाने थोडीशी उसंती घेतल्याने धरण भरण्यास शनिवारी पहाट उजाडली. अखेर परळे निनाई येथील कडवी धरण ओव्हर फ्लो झाले. गेल्या चोवीस तासांत धरण क्षेत्रात ७५ मिमी. पाऊस झाला. धरणाच्या पॉवर हाऊसमधून २०० क्यूसेक व सांडव्यातून ६४५ क्यूसेस, असा एकूण ८४५ क्यूसेक पाण्याचा विसर्ग कडवी नदीपात्रात सुरू आहे. कडवी नदी दुथडी भरून वाहत असल्यामुळे कोपार्डे, शिरगाव, सवते-सावर्डे, सरूड-पाटणे हे बंधारे पाण्याखाली असल्याची माहिती पाटबंधारे शाखाधिकारी उत्तम मोहिते यांनी दिली.

लांबलेला पाऊस, धरणामध्ये घटत चाललेला पाणीसाठा यामुळे पाणीबाणी होतेय की काय? याची चिंता शाहूवाडी तालुक्यातील कडवी नदीकाठावरील २२ गावांना लागून राहिली होती. उशीरा का असेना पावसाचे आगमन झाले आणि अवघ्या महिनाभरात कडवी धरण पुर्णत: क्षमतेने वाहून पिण्याच्या पाण्यासह सिंचनाची चिंता मिटली आहे. गतवर्षी हे धरण ९ ऑगस्ट रोजी भरले होते. त्यानंतर दोनदा भरले. जुनच्या पहिल्या आठवड्यात हजेरी लावणाऱ्या पावसाने दडी मारली. धरणामध्ये असणारे उरले सुरले पाणी पिण्यासाठी राखीव ठेवण्यात आले, पाण्याअभावी पिके धोक्यात आली. परंतु उशिरा का असेना हजेरी लाऊन गैरहजेरीचा वजावटा काढला. ३० जुनला कडवी धरणामध्ये ०.७६ टीएमसी पाणीसाठा होता यावेळी धरण ३० टक्के होते.

कडवी धरणाची पाणी साठवण क्षमता २.५१ टीएमसी इतकी आहे. धरणाची पाणीपातळी ६०१.२५ मी आहे. तर धरणात ७१.२४० दलघमी पाणीसाठा आहे. धरण २.५१ टीएमसी पूर्ण क्षमतेने भरले आहे. गतवर्षी याच तारखेला धरण ८६ टक्के भरले होते. कडवी पाणलोट क्षेत्रात आजअखेर २१७६ मिमी पाऊस बरसला आहे. गतवर्षी हाच आकडा १९०७ मिमी इतका होता. कडवी नदीपात्रात पाण्याचा विसर्ग ८४५ क्युसेकने सुरू असल्याने नदीकाठची ऊस व भाताची पिके पाण्याखाली आहेत. अनेक ठिकाणी ओढ्यांचे पाणी पिकांमध्ये शिरले आहे. काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली असून अनेक ठिकाणी घरांची पडझड झाली आहे. नदीच्या पाणी पातळीत वाढ होत असल्यामुळे नदी शेजारी राहणाऱ्या कुटुंबांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

कडवी व कासारी धरणाची (दि२९) स्थिती :

धरण       पाणीपातळी मी     पाणीसाठा दलघमी     टीएमसी   टक्के
कडवी           ६०१.२५               ७१.२४                  २.५२    १००
कासारी         ६२०.२०               ६४.४९                  २.२८     ८२.०९

हेही वाचा : 

Back to top button