कोल्हापूर : कंपवाताच्या विकारावर शेपू गुणकारी : शिवाजी विद्यापीठाच्या जैवतंत्रज्ञान विभागाचे महत्‍वपूर्ण संशोधन | पुढारी

कोल्हापूर : कंपवाताच्या विकारावर शेपू गुणकारी : शिवाजी विद्यापीठाच्या जैवतंत्रज्ञान विभागाचे महत्‍वपूर्ण संशोधन

कोल्हापूर, प्रवीण मस्के : शेपूची भाजी म्हटले की, नाक मुरडणारे बरेच भेटतात, बरीच कारणे देतात; परंतु शेपूची भाजी आरोग्यासाठी फलदायी आहे. या भाजीत असणार्‍या ‘एल-डोपा’ घटकामुळे मेंदूचे आरोग्य उत्तम चालते. कंपवातावर शेपूची भाजी गुणकारी असल्याचे शिवाजी विद्यापीठातील जैवतंत्रज्ञान विभागातील संशोधनातून सिद्ध झाले आहे. पावसाळा सुरू होऊन महिना झाला आहे. मृग नक्षत्र किंवा पावसासोबत येणार्‍या रानभाज्या व त्यांचे जीवनातील महत्त्व अधोरेखित करणारे आहे. नागरिकांच्या आरोग्याच्या रक्षण व संतुलन राखण्यासाठी शिवाजी विद्यापीठाच्या जैवतंत्रज्ञान विभागातील प्रो. डॉ. ज्योती जाधव,प्रो. डॉ. विश्वास बापट यांच्या मार्गदर्शनाखाली शेपूच्या भाजीवर संशोधन सुरू आहे. यात महत्त्वपूर्ण व अलौकिक गोष्टी समोर आल्या आहेत.

मेंदूचा जो भाग शरीराच्या हालचालींवर नियंत्रण करतो, त्या भागातील चेतापेशींचा हळूहळू नाश होतो. ती विकृती म्हणजे ‘कंपवात.’ हातांना कंप सुटणे, स्नायू ताठर होणे, हालचालींमध्ये शिथिलता येणे व शरीराचा तोल सांभाळण्यात अडचण येणे, ही कंपवाताची मुख्य लक्षणे आहेत. 1817 रोजी बिटिश वैज्ञानिक जेम्स पार्किन्सन यांनी प्रथम लोकांच्या नजरेत ही गोष्ट आणून दिली. 2019 च्या आकडेवारीनुसार जगभरात 8.5 मिलियन लोक कंपवात आजाराने त्रस्त आहेत, तर मृत्युमुखी पडलेल्या लोकांची संख्या लाखोंच्या घरात आहे.

कंपवातावर महत्त्वपूर्ण काम करणारी व सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारी आयुर्वेदिक किंवा सर्वमान्य भाजी म्हणजे शेपू. जगभरात शेपूची पावडर अन्न सजावटीसाठी वापरली जाते. कोवळ्या पानांची शेपूची भाजी, शेपूच्या कोशिंबीरचा आहारात समावेश केला जात आहे. शेपूच्या भाजीमध्ये ‘एल-डोपा’ हा घटक आहे. त्यामुळे शेपूमधील या बायोअ‍ॅक्टिव्ह घटकासोबत बरेच मुख्य घटकाला उपयुक्त असणारे उपघटकदेखील आहेत. विविध प्रकारची मूलद्रव्ये फिनॉलिक्स, फॅबोनाईडस् आहेत. जे ऑक्सिडेटिव्ह ट्रेस, इन्ल्फीमेशन (दाह) कमी करण्यास मदत करतात. हे जैवतंत्रज्ञान विभागातील अभ्यासाअंती सिद्ध झाले आहे. अनेक रुग्णांमध्ये ‘एल-डोपा’ या औषधामुळे कंपविकाराच्या सुरुवातीस आश्चर्यकारक बदल दिसून आल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे.

‘डोपामाईन’चे प्रमाण पूर्ववत करण्याचा इलाज सापडला

कंपवात मध्यवर्ती चेतासंस्थेचा विकार आहे. शरीरातील चेतापेशी नष्ट होतात, तसे ठराविक हालचालींवर नियंत्रण करणे अशक्य होते. यामध्ये ‘डोपामाईन’ नावाचा संदेशवहनाचे काम करणारा घटक महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो. चेतापेशी मृत झाल्यामुळे त्याच्या कार्यात बिघाड होऊन कंपवात सुरू होतो. ‘डोेपामाईन’चे प्रमाण पूर्ववत करणे हा कंपवातावरील प्रमुख इलाज मानला जातो. सध्या हा घटक बाजारातील वेगवेगळ्या औषधांतून दिला जातो. मात्र, याचे तोटे भरपूर आहेत.

Back to top button