Kolhapur : मुरगूडचा सरपिराजीराव तलाव ओव्हरफ्लो! मुरगूडकरांची पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली | पुढारी

Kolhapur : मुरगूडचा सरपिराजीराव तलाव ओव्हरफ्लो! मुरगूडकरांची पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली

मुरगूड : पुढारी वृत्तसेवा : मुरगूड शहराबरोबरच शिदेवाडी व यमगे गावांना पिण्याचा पाणीपुरवठा करणारा व सर्वाची उत्कंठा वाढवलेला सरपिराजीराव तलाव शनिवारी (दि.२९) पहाटे पूर्ण क्षमतेने भरुन ओसंडून वाहू लागला. तलाव भरल्याने पाण्याची चिंता मिटली याबद्दल आनंद द्विगुणीत झाल्याचे मुरगूडकरांनी सांगितले. (Kolhapur)

सरपिराजीराव तलावात एकूण ३७ फूट ६ इंच इतका पाणीसाठा होतो. गेल्या वर्षी हा तलाव ५ जुलैलाच पूर्ण भरला होता. या वर्षी पावसाने ओढ दिल्याने व मान्सूनचे उशिरा आगमन झाल्याने जूनअखेर तलावात केवळ दहा फूट पाणीसाठा शिल्लक होता. पाणीटंचाई तीव्र जाणवत होती. आठवड्यातून रविवार व गुरूवार अशा दोन दिवशी मुरगूड नगरपालिकेने पाणीपुरवठा कपात केली होती. दोन दिवसाच्या ड्राय डे मूळे नागरिकांना काटकसरीने पाणी वापरावे लागत होते. पिण्याच्या पाण्याची चिंता सर्वांनाच लागून राहिली होती. मोठा पाऊस केंव्हा सुरु होईल व हा तलाव केंव्हा भरणार याची प्रतीक्षा व उत्कंठा सर्वांनाच होती.

Kolhapur : अखेर तो दिवस उजाडला…

अखेर तो दिवस उजाडला व शनिवारी (दि. २९ जुलै) पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास सरपिराजीराव तलाव पूर्ण क्षमतेने भरला. तलाव ओसंडून वाहून या पाण्याचा सांडव्यातून ओव्हरफ्लो होऊन विसर्ग सुरु झाला आहे. तलाव भरताच नागरिकांनी निश्वास सोडला. नागरिकांच्या आनंदाला पारावार उरला नाही. भरलेला तलाव व परिसराचे निसर्गरम्य दृश्य पाहाण्यासाठी नागरिकांची पाऊले तलावाकडे वळत आहेत. सरपिराजीराव तलाव पूर्ण क्षमतेने भरल्याने आता मुरगूडकरांची पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली. बारमाही पिण्याच्या पाण्याची पूंजी जमा झाली, अशी लोकभावना व्यक्त होत आहे. आता शहराला शुद्ध व मुबलक पाणी पुरवठा होण्यास त्यामुळे मदत होणार आहे.

हेही वाचा 

Back to top button