कोल्हापूर : 'होलोग्राफिक शो'चा आराखडा तातडीने सादर करा : पालकमंत्री केसरकर | पुढारी

कोल्हापूर : 'होलोग्राफिक शो'चा आराखडा तातडीने सादर करा : पालकमंत्री केसरकर

कसबा बावडा : पुढारी वृत्तसेवा : शाहू जन्मस्थळी पर्यटक आकर्षित होतील यासाठी संग्रहालयाच्या पुढील टप्प्यातील होलोग्राफिक शो चा (आभासी प्रतिमा पाहणे) आराखडा तातडीने सादर करा त्यासाठी आवश्यक तो निधी जिल्हा नियोजन समिती मधून देऊ, असे आश्वासन पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिले. शाहू जयंतीनिमित्त अभिवादन प्रसंगी ते बोलत होते.

२६ जुन २०२४ रोजी शाहू महाराजांची शतकोत्तर सुवर्ण जयंती होत आहे. या पार्श्वभूमीवर जन्मस्थळातील सर्व कामे पूर्ण करण्यात यावी, अशी अपेक्षा शिवप्रेमीतून व्यक्त करण्यात येत होती. याबाबत बोलताना पालकमंत्री केसरकर यांनी संग्रहालयाच्या उर्वरित कामाचा प्राधान्य आराखडा तयार करून तो शासनाला सादर करा, अशी सूचना केली.

यावेळी बोलताना पालकमंत्री केसरकर पुढे म्हणाले, शिक्षणाशिवाय समाजात क्रांती घडू शकत नाही. म्हणून सर्व समाजातील मुलांसाठी शाहू महाराजांनी त्या काळात शाळा आणि वसतिगृहांची सुरुवात केली. त्यांच्या दूरदृष्टीतून राधानगरी धरण साकारले, यामुळे हरितक्रांती झाली. वीज निर्मितीमुळे पुढच्या काळात उद्योगाला चालना मिळाली. शाहू महाराजांनी कला, क्रीडा आणि सांस्कृतिक कार्यालाही राजाश्रय दिला. आधुनिक विचारातून शाहू महाराजांनी शाहू मिलची स्थापना केली. या ठिकाणी शाहू महाराजांची आठवण म्हणून सर्वसामान्यांसाठी रोजगार, स्किल डेव्हलपमेंट, कॉन्फरन्स आदी सुविधा निर्माण करून त्यांच्या स्मृती जपण्याचा सर्वांचा मानस असल्याचे यावेळी स्पष्ट केले. येणाऱ्या काळात शाहू महाराजांच्या विचारावर मार्गक्रमण करू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

प्रारंभी लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या १४९ व्या जयंतीनिमित्त सकाळी ८ वाजता शाहू जन्मस्थळी पालकमंत्री दीपक केसरकर, उच्च व तंत्र शिक्षण वस्त्रोद्योग संसदीय कार्यमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. यावेळी खा. धनंजय महाडिक, आ. सतेज पाटील, आ. जयश्री जाधव, आ. प्रकाश आवाडे, आ. जयंत आसगावकर, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, अति. आयुक्त रविकांत आडसुळ, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, जिल्हा पोलीस प्रमुख महेंद्र पंडीत, वसंतराव मुळीक, इंद्रजीत सावंत, नाना कदम, शहर अभियंता हर्षजीत घाटगे, राहूल चिकोडे, गोकुळचे अध्यक्ष अरुण डोंगळे यांच्यासह माजी नगरसेवक, श्रीराम सेवा संस्थेचे संचालक, विविध संस्थांचे पदाधिकारी शाहूप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान शहाजीराजे संभाजीराजे छत्रपती यांनी शाहू जन्मस्थळी भेट देऊन लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करत अभिवादन केले.

हेही वाचा : 

Back to top button