शाहू-फुले-आंबेडकर यांचे सामाजिक न्यायाचे विचार अंगीकारण्याची गरज : राज्यमंत्री डॉ. भारती पवार

शाहू-फुले-आंबेडकर यांचे सामाजिक न्यायाचे विचार अंगीकारण्याची गरज : राज्यमंत्री डॉ. भारती पवार
Published on
Updated on

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा :  'वसुधैव कुटुंबकम' या तत्त्वाप्रमाणे भारताने अनेक देशांना सहकार्य करत विकास जगाला दाखवून दिला आहे. अमृतमहोत्सवी वर्षात पुढील 25 वर्षे महत्त्वाची आहेत. शतक महोत्सवाचा आराखडा पुढे जाण्यासाठी प्रत्येकाने त्या जाणिवेतून काम करावे. देशाच्या प्रगतीसाठी प्रत्येकाने शाहू-फुले-आंबेडकर यांचे सामाजिक न्यायाचे विचार अंगीकारायला हवेत, असे प्रतिपादन केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी केले.

विवेक विचार मंच, सहयोगी संस्था व शिवाजी विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती व सामाजिक न्याय दिनानिमित्त शिवाजी विद्यापीठात आयोजित राज्यस्तरीय सामाजिक न्याय परिषदेत त्या बोलत होत्या. परिषदेचे उद्घाटन मंत्री डॉ. पवार, कामगारमंत्री सुरेश खाडे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी सामाजिक न्यायासाठी महत्त्वपूर्ण योगदान देणार्‍या दौलतराव खरात (बुलढाणा), वाल्मिक निकाळजे (बीड), योगेश शिंदे (नाशिक), प्रा. डॉ. अमर कांबळे (इचलकरंजी) यांना राजर्षी शाहू महाराज सामाजिक न्याय पुरस्काराने गौरविण्यात आले.

मंत्री डॉ. पवार म्हणाल्या, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने भारताने कोरोना काळात इतर देशांना औषधे, लसींचा पुरवठा व अन्य संकटकालीन मदत केली आहे. सामाजिक न्यायाने देशाला पुढे नेण्याचे संविधाने शिकवले आहे. संविधानाचा सन्मान करणे, प्रत्येकाचे कर्तव्य असून देशाचा विकास साधताना स्त्री शक्तीचा सन्मान होणे महत्त्वाचे आहे.

कामगारमंत्री सुरेश खाडे म्हणाले, बहुजन समाजाच्या उन्नतीमध्ये महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. महापुरुषांनी दिलेला सामाजिक न्यायाचा विचार व त्यांच्या कार्याचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून प्रत्येकाने वाटचाल करायला हवी.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्हिडीओच्या माध्यमातून शुभेच्छा संदेश दिला. ते म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराजांनी सामाजिक समतेचा संदेश देत समाजाला योग्य दिशा व सामाजिक भान दिले. सामाजिक समतेचा संदेश व त्यासाठी कार्य करून लोकशाहीची मुहूर्तमेढ छत्रपती शाहू महाराजांनी कोल्हापुरात रोवली. याच विचारांनी लोकशाही मार्गाने वाटचाल करत भारत देशाने सर्व क्षेत्रात प्रगती साधली आहे.

'बार्टी'चे महासंचालक सुनील वारे म्हणाले, अनुसूचित जाती- जमातीतील प्रत्येकाला प्रशिक्षण देऊन हाताला काम मिळवून देण्याचे काम 'बार्टी'च्या माध्यमातून करण्यात येत असून याचा लाभ घ्यावा.

कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के म्हणाले, जाती-धर्मांतील भेद नष्ट करून समाजात समता प्रस्थापित करण्यासाठी फुले, शाहू, आंबेडकर यांच्यासारख्या महापुरुषांचे विचार जोपासणे गरजेचे आहे. प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील म्हणाले, शिवाजी विद्यापीठाने शाहू महाराजांचे जीवनचरित्र दोन परकीय भाषांबरोबरच विविध राज्यांच्या भाषेमध्येही भाषांतर करून शाहू महाराजांचे कार्य देश-विदेशात पोहोचवण्याचे प्रयत्न केले. विवेक मंचचे अध्यक्ष प्रदीप रावत यांनी प्रास्ताविक केले. सागर शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. अरुण कराड यांनी संविधान सरनामा वाचन केले. कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे यांनी आभार मानले.

काँग्रेसकडून जागतिक पटलावर भारताची बदनामी

पंतप्रधान नरेंद्र मोंदी यांच्या नेतृत्वाखाली देशाची जागतिक पटलावर वेगळी ओळख निर्माण झाली आहे. परंतु, सभागृहात न येता, बोलू दिले जात नाही, असा आरोप करणारे काँग्रेसचे नेते राहुल गांधी अमेरिकेत जाऊन भारताची लोकशाही धोक्यात असल्याचे सांगत आहेत. हे संविधान कोणासाठी आहे, हेच कळत नाही. भारताबद्दल चुकीचे, निंदनीय राजकारण करून संविधानाचा अपमान करण्याचा त्यांना नैतिक अधिकार नाही, असा टोला केंद्रीय राज्यमंत्री पवार यांनी लगावला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news