

विशाळगड; सुभाष पाटील : 'भेटी लागे जीवा… लागलीसे आस…' अशा भक्तिमय वातावरणात शाहूवाडी तालुक्यातून निघालेल्या माऊलीच्या पालख्या, दिंड्याने अवघ जनजीवन माऊलीमय झाले आहे. सर्वत्र भक्तीचा मळा पहायला मिळत असून गावकऱ्यांकडून या दिंड्यांचे भक्तीभावाने स्वागत केले जात आहे. प्रत्येकाच्या मनात साक्षात माऊलीच आपल्या गावात, दारात आलेत अशीच श्रध्दा निर्माण झाली असून 'साधू संत येती घरा, तोचि दिवाळी दसरा' अशा भावूक वातावरणाने नागरिक भारावले आहेत.
आषाढाची चाहूल लागली की, वारकऱ्यांना ओढ लागते, ती पांडुरंगाच्या दर्शनाची. कानाकोपऱ्यातून वारकरी, विठ्ठल भक्त संतांच्या दिंडीमध्ये सहभागी होत महिनाभराचा पायी प्रवास करत आषाढी एकादशी दिवशी पंढरपुरात दाखल होतात. शाहूवाडी तालुक्यातील अनेक मार्गावरून दिंड्यांचा प्रवास पंढरीच्या दिशेने होत आहे. दिंडीतून टाळ, मृदुंगाचा होणारा गजर आणि रामकृष्ण हरी, ज्ञानोबा माऊली तुकारामच्या जयघोषाने रस्ते दुमदुमत आहेत. आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठल दर्शनाच्या ओढीने मार्गक्रमण करत असलेल्या विविध संतांच्या दिंड्यांनी वातावरण भक्तिमय बनले आहे.
आडमार्गानेही अनेक छोट्या-मोठ्या दिंड्या पंढरपूरकडे मार्गस्थ होत आहेत. अनेक गावातून जाणाऱ्या दिंड्यामुळे वातावरण भक्तीमय बनले आहे. प्रत्येक गावातील ग्रामस्थांकडून पालखी, दिंडी सोहळ्याचे वाजत गाजत स्वागत आणि वारकऱ्यांचे मनोभावे आदरातिथ्य होत आहे. गावकऱ्यांकडून वारकऱ्यांसाठी प्रत्येक ठिकाणी शुद्ध पाण्याची व्यवस्था, भोजन, नाश्ता, चहापाण्याची खास व्यवस्था केली जात आहे. दिंडी मुक्कामाच्या ठिकाणी परिसर स्वच्छता, विजेची व्यवस्था करून वारकऱ्यांना कसल्याही बाबीची कमतरता जाणवू नये यासाठी ग्रामस्थ चोखपणे भूमिका पार पाडत आहेत. वारीला साडेसातशे वर्षांची वारकरी संप्रदायाची परंपरा आहे. घरी आर्थिक चणचण असली तरी सर्व सोडून बरेच दिवसांनी केवळ विठुरायाचे दर्शन होणार, या एकाच आशेने वारकरी वारी करतात. खेड्यांपाड्यातून अनवाणी चालत, वाटेत ऊन, वारा, पाऊस यांची तमा न बाळगता, मिळेल त्या ठिकाणी राहत, मिळेल ते अन्न खात आनंदाने वारी करतात. टाळ, मृदुंगाच्या गजरात विठुरायाचे नाम मुखात घेत भक्तीत तल्लीन होऊन मार्गक्रमण करत वारी करतात. यामध्ये विठुरायाची शुध्द भक्ती हाच उद्देश असतो.
रात्रंदिवस वाहनांच्या कर्णकर्कश हॉर्नच्या आवाजाचा नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. मात्र सध्या महामार्गावरून विठ्ठलाच्या दर्शनाच्या ओढीने पंढरीकडे मार्गक्रमण करणाऱ्या दिंडीतून होणारा हरिनामाचा जयघोष अन् टाळ, मृदंगाचा गजर नागरिकांच्या कानी पडत असल्याने भक्तिमय वातावरण बनले आहे.
पाऊस लांबल्याने महामार्गावरील गावामध्ये पाणी टंचाईच्या झळा बसत आहेत. ग्रामस्थांना पाणी टंचाईला तोंड द्यावे लागत असले तरी दिंडीतील वारकऱ्यांची तहान प्रत्येक गावातील ग्रामस्थांकडुन भागविली जात आहे. वारकऱ्यांचे आदरातिथ्य, व्यवस्था करण्याचे काम ग्रामस्थांकडून चोखपणे पार पडले जात आहे.
हेही वाचा :