विठ्ठलाचे २४ तास दर्शन सुरू; भाविकांना सुलभ व जलद दर्शन मिळणार 

आषाढी यात्रा
आषाढी यात्रा
Published on
Updated on

पंढरपूर; पुढारी वृत्तसेवा :  आषाढी यात्रेसाठी येणार्‍या जास्तीत जास्त भाविकांना सुलभ व जलद दर्शन मिळावे, यासाठी परंपरेनुसार मंगळवार, दि. 20 पासून श्री विठ्ठल-रुक्मिणीचे 24 तास मुखदर्शन, तर 22.15 तास पदस्पर्श दर्शन सुरू करण्यात आले आहे. मंगळवारी सकाळी 11 वाजता श्री विठ्ठलाचा पलंग काढण्यात आला आहे. विठ्ठलाच्या मूर्तीच्या पाठीशी लोड देण्यात आला आहे; तर रुक्मिणी मातेच्या मूर्तीच्या पाठीशी तक्क्या देण्यात आला आहे. त्यामुळे मंगळवारपासून पुढील 15 दिवस भाविकांना दर्शन देण्यासाठी श्री विठ्ठल-रुक्मिणी न थकता उभे राहणार आहेत.

दरम्यान, देवाचा पलंग काढण्यात आल्यामुळे राजोपचार बंद करण्यात आले आहेत. देवाला एकवेळ महानैवेद्य आणि केवळ लिंबू पाणी दिले जात आहे. आषाढी यात्रेसाठी 15 ते 18 लाख भाविक पंढरीत येतील, असा प्रशासनाचा अंदाज आहे. या सर्व भाविकांना विठ्ठल दर्शन मिळावे, यासाठी आषाढ शुद्ध प्रथमा या दिवसापासून ते पौर्णिमेपर्यंत विठ्ठलदर्शन 24 तास सुरू ठेवण्यात येते. त्यामुळे 24 तास दर्शन सुरू झाले आहे.

दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या पंढरीत मागील दोन दिवसांपासून आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर शहरात भाविकांची गर्दी वाढल्याचे दिसून येत आहे. सध्या अधिक मासामुळे भाविकांची गर्दी होताना दिसून येत आहे. भाविक दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात उत्सुक आहेत. त्या द़ृष्टिकोनातून पूर्वीच्या परंपरेप्रमाणे आषाढी प्रतिपदेपासून देवाचा पलंग काढण्यात आला आहे. मंगळवारी सकाळी 11 वाजता विधिवत पूजा करून देवाचा पलंग काढला आहे. पलंग काढताच भाविकांना विठुरायाचे 24 तास दर्शन मिळेल, अशी सोय करण्यात आली आहे

श्री विठ्ठल-रुक्मिणीचे 24 तास दर्शन 20 जून ते 7 जुलै या कालावधीदरम्यान सुरू राहणार आहे. या कालावधीत रांगेत थांबलेल्या भाविकांची कोणतीही गैरसोय होऊ नये, दर्शनाच्या सुविधेमध्ये कोणत्याही प्रकारची अडचण होऊ नये, याकरिता मंदिर प्रशासन व जिल्हा प्रशासनाने आवश्यक त्या उपाययोजना केल्या असल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली.

व्हीआयपी दर्शन बंद

आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर जास्तीत जास्त भाविकांना पदस्पर्श दर्शन मिळावे म्हणून व्हीआयपी दर्शन बंद केले आहे. यामुळे दर्शन रांगेत उभारलेल्या सर्वांना दर्शन घेता येणार आह. व्हीआयपींनादेखील दर्शन रांगेत उभे राहून दर्शन घ्यावे लागणार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news