कोल्हापूर: निवडणूक ‘भोगावती’ ची चर्चा मात्र ‘बिद्री’ ची; सोशल मीडियावर चर्चेला उधाण | पुढारी

कोल्हापूर: निवडणूक 'भोगावती' ची चर्चा मात्र 'बिद्री' ची; सोशल मीडियावर चर्चेला उधाण

बिद्री; पुढारी वृत्तसेवा :  भोगावती साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात उन्हाळा आणि बिद्री साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात पावसाळा, प्रादेशिक निवडणूक आयोगाचा हा अजब प्रकारच म्हणायचा !, ब्रेकिंग न्यूज : गारगोटीत महापूर. पूरग्रस्तांचे पालीच्या घाटात १२० एकर जागेवर स्थलांतर!, ‘बिद्री’ व ‘भोगावती’ पावसाळी ढगांना कार्यक्षेत्रानुसार अडविणार आहेत, असा उपासात्मक संदेशाचा मजकूर दिवसभर सोशल मीडियावर फिरत आहे. त्यामुळे निवडणूक ‘भोगावती’ची चर्चा मात्र ‘बिद्री’ ची अशा चर्चांना सोशल मीडियावर उधाण आले होते.

भोगावती साखर कारखान्याची निवडणूक सोमवारी जाहीर झाली. हे वृत्त प्रसिद्ध होताच बिद्री साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात चर्चेला उधाण आले. हमिदवाडाबरोबर बिद्री साखर कारखाना पंचवार्षिक निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली. त्यापाठोपाठ भोगावती साखर कारखान्याचीही निवडणूक प्रक्रिया सुरु झाली. ‘बिद्री ‘ निवडणूक प्रक्रिया मध्यावर येऊन १७ मे ला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली. यावर विरोधी गटाचे नेते आमदार प्रकाश आबिटकर यांनी ‘बिद्री’ कार्यक्षेत्रात मोठ्या पावसाची शक्यता व्यक्त करीत निवडणूक पावसाळ्यानंतर घ्यावी, अशी पत्राद्वारे मागणी केली. त्यानंतर शासनाच्या निवडणूक प्राधिकरणाने सप्टेंबर २०२३ नंतर निवडणूक घेण्याचा आदेश दिला होता. यामुळे निवडणुकीची तयारी करणाऱ्या इच्छुकांच्या पदरी निराशा पडली होती.

या आदेशाच्या विरोधात निवडणूक त्वरीत घेण्यासाठी सत्तारूढ गटाने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.  याच दरम्यान ‘भोगावती’ची निवडणूक प्रक्रिया प्राधिकरणाने पूर्ण केली. सोमवारी निवडणूक कार्यक्रम जाहीर करीत ३० जुलै ला मतदान होणार असल्याचे जाहीर करण्यात आले. भोगावतीची निवडणूक जाहीर होताच ‘बिद्री’ च्या सत्तारूढ गटाच्या समर्थक नेटकऱ्यांनी उपहासात्मक संदेशाचा अक्षरश: पाऊस पाडला. बिद्री व भोगावती यातील अंतर केवळ १५ किलोमीटर आहे. पाऊस फक्त बिद्री कार्यक्षेत्रात लागणार आहे व ‘भोगावती’ परिसरात उन्हाळा असणार आहे, असा खोचक संदेश फिरत आहे. त्यामुळे निवडणूक ‘भोगावती ‘ असली तरी सोशल मीडियावर चर्चा मात्र ‘ ब्रिदी’ चीच रंगली आहे.

संबंधित बातम्या

       हेही वाचलंत का? 

Back to top button