भोगावती कारखान्यासाठी 23 जुलैला मतदान? | पुढारी

भोगावती कारखान्यासाठी 23 जुलैला मतदान?

गुडाळ, पुढारी वृत्तसेवा : भोगावती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची प्रक्रिया पुढील आठवड्यात सुरू करून 23 जुलै रोजी मतदान घेण्याचा प्रस्ताव प्रादेशिक सहसंचालक (साखर) यांनी राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाकडे मंजुरीसाठी पाठविला असून, जुलैमधील अतिवृष्टीचे कारण देत बिद्री साखर कारखान्याची निवडणूक लांबणीवर टाकलेले प्राधिकरण ‘भोगावती’चा निवडणूक कार्यक्रम मंजूर करणार का? याकडे लक्ष लागले आहे.

संचालक मंडळाची मुदत संपून एक वर्ष उलटून गेले आहे. 2 जून रोजी कारखान्याची पक्की मतदारयादी प्रसिद्ध झाली असून, प्रशासनाने निवडणूक प्रक्रिया त्वरित सुरू करावी, अशी मागणी प्राधिकरणाकडे केली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हा उपनिबंधक नीळकंठ करे यांची केलेली शिफारस सहकार प्राधिकरणाने मान्यही केली आहे. संभाव्य निवडणूक कार्यक्रम सहकार प्राधिकरणाकडे मंजुरीसाठी पाठविला आहे. त्यानुसार 20 जूनपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होऊन 23 जुलै रोजी मतदान होणे अपेक्षित आहे. ‘भोगावती’चे कार्यक्षेत्र असलेल्या राधानगरी आणि करवीर तालुक्यांत जुलै महिन्यात अतिवृष्टी होत असते.

याच तालुक्यांतील गावांचा समावेश असलेल्या ‘बिद्री’ची निवडणूक अतिवृष्टीच्या कारणावरून शासनाने 30 सप्टेंबरपर्यंत लांबणीवर टाकली आहे. विशेष म्हणजे, ‘बिद्री’चे मतदान 9 जुलै रोजी होणार होते, तर ‘भोगावती’चे मतदान 23 जुलै रोजी घेण्याचे नियोजन आहे. या पार्श्वभूमीवर ‘भोगावती’ची निवडणूक प्रक्रिया सहकार प्राधिकरण सुरू करणार का? याविषयी जिल्ह्यात उत्सुकता आहे. दरम्यान, कारखान्याची बिकट आर्थिक परिस्थिती पाहता निवडणूक बिनविरोध व्हावी, ही सत्तारूढसह विरोधी आघाडीचीही इच्छा आहे. मात्र, सर्वमान्य, सर्वसमावेशक बिनविरोध संचालक मंडळ निवडणे ही अशक्यप्राय गोष्ट शक्य होणार का? याबाबत कार्यक्षेत्रात साशंकता आहे.

Back to top button