बिद्रीची निवडणूक बिनविरोध व्हावी ही सर्वांचीच इच्छा : आमदार हसन मुश्रीफ | पुढारी

बिद्रीची निवडणूक बिनविरोध व्हावी ही सर्वांचीच इच्छा : आमदार हसन मुश्रीफ

मुदाळतिट्टा; पुढारी वृत्तसेवा : बिद्री साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध व्हावी, ही सर्वांचीच इच्छा आहे. ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सकारात्मक असलेल्या खासदार संजय मंडलिक यांचे स्वागतच आहे, असे प्रतिपादन आमदार हसन मुश्रीफ यांनी केले. कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष व माजी आमदार के. पी. पाटील यांच्या नेतृत्वाखाली यामध्ये यश मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

कुरुकली (ता. कागल) येथे साडेसात कोटींच्या विकासकामांचा लोकार्पण व शुभारंभ तसेच आयुष्मान भारत, प्रधानमंत्री जनआरोग्य कार्डचे वितरण आमदार मुश्रीफ यांच्यासह प्रमुख मान्यवरांच्या हस्ते पार पडला. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार संजयबाबा घाटगे होते.

यावेळी आमदार मुश्रीफ म्हणाले की, बिद्री कारखान्याची अर्थव्यवस्था सशक्त ठेवून सातत्याने प्रत्येक वर्षी सर्वाधिक दर देण्याची किमया करणारे कारखान्याचे अध्यक्ष के. पी. पाटील यांच्याच नेतृत्वाखाली बिद्री कारखान्याचा कारभार असावा, अशीच सामान्य सभासद आणि जनतेची इच्छा आहे. साखर उद्योग अडचणीत असताना बिद्री साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध व्हावी खा. संजय मंडलिक सकारात्मक आहेत. याबद्दल त्यांचे स्वागत आहे. पण, प्रत्यक्षात ७५ हजार सभासद, चार तालुक्याचे कार्यक्षेत्र व इच्छुकांची संख्या पाहता हे कसं शक्य होईल की नाही, याबद्दल मनात थोडी शंका वाटते. तरीही बिद्रीची निवडणूक बिनविरोध व्हावी, अशीच सर्वांची इच्छा आहे, ती प्रत्यक्षात उतरावी इतकीच इच्छा आहे, असे मुश्रीफ म्हणाले.

माजी आमदार के. पी. पाटील म्हणाले, कुरुकली हे एक वैचारिक गाव आहे. आमदार मुश्रीफ यांच्या माध्यमातून राष्ट्रवादीचे कागल तालुका अध्यक्ष विकास पाटील यांनी सर्व योजना तळागाळापर्यंत पोहोचवल्या. आमदार मुश्रीफ यांच्याशी आपली ४२ वर्षांची मैत्री आहे. त्यांनी आपल्याला येईल त्या परिस्थितीमध्ये सहकार्य केलं आहे. बिद्री साखर कारखान्याच्या अडचणीच्या काळातही त्यांनी खूप मदत केली आहे. म्हणूनच आज हा साखर कारखाना दर देण्यामध्ये उच्चांक करीत असल्याचे त्यांनी सांगितले.

माजी आमदार संजयबाबा घाटगे म्हणाले, आमदार मुश्रीफ यांनी मिळेल त्या संधीचा पुरेपूर वापर करून सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू मानून काम केले आहे. त्यांना येणाऱ्या विधानसभा निवडणुकीतही निवडून देऊन कागल तालुक्यातील रेकॉर्ड ब्रेक करूया, असे आवाहन घाटगे यांनी केले.

कार्यक्रमाचे संयोजक, राष्ट्रवादीचे कागल तालुका अध्यक्ष विकास पाटील-कुरुकलीकर म्हणाले, आमदार मुश्रीफ यांच्या मार्गदर्शनाखाली इतक्या छोट्या गावामध्ये कोट्यावधी रुपयांचा निधी दिला. तसेच गावासाठी जलजीवन मिशन अंतर्गत दोन कोटी तीस लाख रुपये पिण्याच्या पाण्याच्या योजनेसाठी उपलब्ध करून दिले आहेत. त्यामुळे या गावाचा कायापालट होत आहे.

शशिकांत खोत यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले. स्वागत सरपंच मीनाक्षी कुंभार यांनी केले. प्रास्ताविक उपसरपंच गिरीश पाटील यांनी केले. तर आभार सुरेखा पाटील यांनी मानले. यावेळी गोकुळ दूध संघाचे संचालक युवराजबापू पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, सूर्याजी घोरपडे, बाजार समिती संचालक धनाजी तोरस्कर, बी. जी. पाटील, नाना कांबळे, बिद्रीचे संचालक प्रवीणसिंह भोसले, उमेश भोईटे, मनोज फराकटे, दिग्विजय पाटील आदी उपस्थित होते.

मेव्हणे -पाहुणे आतून एकच

या कार्यक्रमाला ए. वाय. पाटील आले होते पण मंचावर थांबले नाहीत. याकडे लक्ष वेधत आमदार मुश्रीफ म्हणाले, के. पी. पाटील आणि ए. वाय. पाटील या मेव्हणे-पाहुण्यांशी माझी ४० वर्षापासूनची मैत्री आहे. त्यांनी कधीही आपल्या भावनांचा अनादर केला नाही. या दोघांनाही कसे एकत्र बांधायचे हे मला चांगलच माहिती आहे. त्यांच्यात कुठलेही मतभेद नाहीत. आतून ते दोघे एकत्रच आहेत, असे म्हणताच हशा पिकला. येणाऱ्या काळात आपण स्वतः के. पी. पाटील व ए. वाय. पाटील यांच्याबाबत निर्णय घेऊ, असेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा : 

Back to top button