रत्नागिरी : राजू शेट्टी यांच्यासह सहाजणांवरील जिल्हा बंदी आदेश मागे | पुढारी

रत्नागिरी : राजू शेट्टी यांच्यासह सहाजणांवरील जिल्हा बंदी आदेश मागे

रत्नागिरी : पुढारी वृत्तसेवा : बारसू येथील प्रस्तावित रिफायनरीच्या माती परीक्षणादरम्यान आंदोलने सुरू झाली होती. या आंदोलनाला पाठिंबा देणार्‍या माजी खा. राजू शेट्टी यांच्यासह स्थानिक पदाधिकार्‍यांना जिल्ह्यात प्रवेश करण्यास व संचार करण्यास मनाई करण्यात आली होती. बारसू येथील माती परीक्षण काम संपल्यामुळे आता हे मनाई आदेश रद्द केल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी तथा अप्पर जिल्हा दंडाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी जाहीर केले आहे. पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी याबाबत जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांना आदेश मागे घेण्याबाबत पत्र दिले होते. त्यानुसार स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष व खा. देवप्पा आण्णा शेट्टी उर्फ राजू शेट्टी, जनार्दन गुंडू पाटील, अशोक केशव वालम, जालिंदर गणपती पाटील, स्वप्नील सीताराम सोगम आणि सत्यजित विश्वनाथ चव्हाण यांना जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी जिल्ह्यात फिरण्यास मनाई आदेश जारी केला होता.

या संदर्भात खा. राजू शेट्टी यांनी न्यायालयात जाण्याचाही इशारा दिला होता. दरम्यान, बारसू येथील माती परिक्षणाचे काम संपल्यामुळे या भागात शांतता प्रस्तापित झाली आहे. या पार्श्वभूमीवर पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी सहाजणांना करण्यात आलेली जिल्ह्यातील संचारबंदी मागे घेण्यात यावी याचे पत्र जिल्हाधिकार्‍यांना दिले होते. त्यानुसार निवासी उपजिल्हाधिकारी तथा अपर जिल्हा दंडाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी संचारबंदीचे आदेश रद्द केले आहेत.

हेही वाचा : 

Back to top button