मिणचे खुर्द (कोल्हापूर); पुढारी वृत्तसेवा : पंडीवरे (ता. भुदरगड) येथील विठ्ठल शेळवाडकर, रामचंद्र शेळवाडकर व बाबुराव शेळवाडकर या तिघा भावंडाच्या शेतातील घरांना आग लागली. या आगीत विठ्ठल शेळवाडकर यांचे घर व घरातील सर्व साहित्य जळून खाक झाले. त्यात लाखो रुपयांचे नुकसान झाले. पण, अगीच्या भक्षस्थानी पडलेली जनावरे व इतर घरे विलास गुरव व समीक्षा गुरव या बाप लेकींच्या प्रसंगावधानाने वाचली आहेत. बारा जनावरांना जीवनदान देणाऱ्या या बाप लेकीच्या धाडसाचे कौतुक होत आहे.
पंडिवरे – बोंगार्डेवाडी दरम्यान पश्चिमेस असणाऱ्या आंबे शेत येथील शेतात शेळवाडकर भावंडांची घरे आहेत. त्यांच्या घरास अचानक आग लागली, या आगीत विठ्ठल शेळवाळकर यांचे घर आगीच्या भक्षस्थानी पडले. तर रामचंद्र शेळवाडकर यांची सर्व जनावरांसाठी राखून ठेवण्यात आलेले वैरण जळून खाक झाले. आपल्या शेताकडे जाणाऱ्या विलास गुरव व त्यांची मुलगी समीक्षा गुरव या बाप लेकीने या तिन्ही घरांमध्ये असणारी बारा जनावरांची आगीतून अत्यंत धाडसाने सुटका केली.
आगीच्या लोटातून घरात जाणेही शक्य नसताना देखील या दोघांनी प्रसंगावधान राखून जनावरांना बाहेर काढले. अन्य घरांना लागलेली आग आटोक्यात आणली व ग्रामस्थांना संपर्क केला. आणखी थोडा उशीर झाला असता तर ही बारा जनावरांसह इतर दोन घरेही आगीने पेटली असती. या भीषण आगीत शेळवाडकर यांचे रोटा वेटर शेतीची अवजारे, गवत, पिंजर जळून खाक झाले तर एक गाय जखमी झाली.
अधिक वाचा :