राज्यपालांकडे सरकार बरखास्त करण्याची मागणी करणार : नाना पटोले | पुढारी

राज्यपालांकडे सरकार बरखास्त करण्याची मागणी करणार : नाना पटोले

ठाणे; पुढारी वृत्तसेवा : भाजपचे केंद्र आणि राज्य सरकार हे सर्व आघाड्यांवर अपयशी ठरल्याने जनतेचे लक्ष दुसरीकडे भरकटविण्यासाठी जातीय दंगली घडविल्या जात आहेत. छत्रपती संभाजीनगरमधील तणावपूर्ण परिस्थितीबाबत पूर्वकल्पना मिळूनही पोलिसांनी दुर्लक्ष केल्याने दंगल घडली. त्यातील आरोपींना अद्याप अटक ही झालेली नसून भाजपच्या काळातच दंगली का होतात, असा प्रश्न विचारला आहे. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गावात म्हणजेच ठाणे शहरात सर्वसामान्य नागरिक काय पोलिसही सुरक्षित राहिलेला नाही. सरकारच्या दबावाखालीच पोलीस काम करीत असून पोलीस हवालदार वैभव कदम यांची आत्महत्या देखील संशयास्पद असून माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांना अडकविण्याचे प्रयत्न होत असल्याचा गंभीर आरोप करत हे सरकार तातडीने बरखास्त करावे, अशी मागणी राज्यपालांना भेटून करणार असल्याची माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्योगपती अदानी यांचे संबंध आणि सेल कंपन्यांमधील २० हजार कोटी रुपये कुणी गुंतवले आहेत? एलआयसी, एसबीआय, पीएफ मधील हजारो कोटी रुपये अदानीला कसे दिले ? विमानतळ, रेल्वे तसेच संरक्षण विभागाचे ठेकेही त्यांना दिले आणि त्यात कुणाची भागीदारी आहे ? आदी प्रशांबाबत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी सातत्याने प्रश्न विचारले आहेत. त्यामुळे अडचणीत आलेल्या भाजप सरकारने सर्वसामान्यांचे हजारो कोटी रुपये घेऊन विदेशात पळून गेलेल्या ललित मोदी, निरव मोदी यांना चोर म्हटल्याच्या निमित्ताने गांधी ह्यांची खासदारकी रद्द केली. तुम्ही गांधींच्या नादाला लागू नका, इंग्रजांनाही लावे लागले आहे, असा इशारा देताना जनतेच्या मनातील राग हा मतपेटीतून दिसून येईल, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपला सुनावले आहे.

राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या माजी अंगरक्षकाचा मृत्यु हा संशयास्पद आहे. पोलिसांवर दबाव आणला जातोय आणि त्यांना चुकीच्या कारवाया करण्यास भाग पाडले जात आहे, त्यातूनच अशा घटना पुढे येत आहेत. या प्रकरणाचा तपास सुरु असल्याने त्यावर अधिक भाष्य करणार नाही. परंतु मला जे काही माहित आहे, ते संशयास्पद आहे. सरकारच्या माध्यमातून दबाव वाढत चालला आहे.

सर्वसामान्य जनतेचे जगणे मुश्कील झाले आहे, असा आरोपही पटोले यांनी केला. काँग्रेसचे पदाधिकारी गिरीश कोळी यांच्यावर झालेला हल्ला आणि ठाणे काँग्रेसचे शहराध्यक्ष विक्रांत चव्हाण यांना ठार मारण्याची आलेली धमकी, याप्रकरणाकडे पोलिस विभाग लक्ष घालत नसेल तर पोलिस विभागावर नेमका दबाब कुणाचा आहे, माफिया की सरकार, हे स्पष्ट होणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले. हिंदूच्या नावाने राज्यात तणाव निर्माण करण्याचे आणि धर्माधर्मात भांडणे लावण्याचे काम सुरु झाले आहे. देशात आणि राज्यात हिंदूचे सरकार आहे. या सरकारच्या काळात हिंदूंना न्याय मिळाला हवा आहे. परंतु हिंदूंचे सरकार असतानाही त्यांना आक्रोश मोर्चे कशासाठी काढावे लागत आहेत? हा प्रश्न उपस्थित होत असल्याचेही ते म्हणाले.

लोकशाही विघातक व्यवस्था सरकारच्या माध्यमातून तयार केली जात असेल तर त्याची दखल आणि माहिती घेऊन राज्यपालांनी सरकार बरखास्तची कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली. राज्याचे सरकार नुपसक असल्याची टिप्पणी सर्वोच्च न्यायालयाने केली आहे. राज्याच्या इतिहासातील ही पहिली घटना आहेत. या सरकारने तातडीने राजीनामा देऊन बाजूला जायला पाहिजे होते. कारण हा शाहू, फुले आणि आंबेडकर विचारांचा अवमान आहे. तरी ही राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात की सर्वोच्च न्यायालयाने असे काहीच म्हटलेले नाही. त्यांना याबाबत काहीच माहित नसेल तर हे राज्याचे दुर्भाग्य आहे, असेही ते म्हणाले. काँग्रेस पदाधिकाऱ्याला मारहाण केल्याची अदयाप पोलिसांनी तक्रार घेतली नसून त्याबाबत पोलीस आयुक्तांशी बोलणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी प्रदेश सरचिटणीस मनोज शिंदे, शहर अध्यक्ष ऍड विक्रांत चव्हाण, ठाणे प्रभारी संतोष केणी, प्रवक्ते सचिन शिंदे, ग्रामीणचे अध्यक्ष दयानंद चोरगे आदी नेते मंडळी उपस्थित होते.

छत्रपती संभाजीनगर येथील सभेबाबत चर्चेनंतर निर्णय

छत्रपती संभाजीनगरमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण होत असून त्याकडे लक्ष द्या, असे काँग्रेसचे स्थानिक नेत्यांनी तसेच राज्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी पोलिस आयुक्त गुप्ता यांना सांगितले होते. पण, त्यांनी केवळ दोन पोलिस पाठवून याकडे मुद्दामहून दुर्लक्ष केले आहे. याचाच अर्थ सरकारच्या सुचना पोलिस विभागाला आहेत. दंगल, मारपीट आणि रक्तपात होऊ द्या, असा सरकारचा उद्देश आहे. कारण याप्रकरणात कुणालाही अटक झालेली नसून पोलिस आयुक्त तिथेच बसून आहेत. पोलिस आयुक्त आणि अधिक्षकांना एकच काम दिलेले आहे, ते म्हणजे अवैध धंदे सुरु करा आणि त्यातून पैसे जमा करून सरकारला द्या. असा व्यवसाय सरकारने चालविला आहे का ? आणि जनतेच्या सुरक्षेकडे मुद्दाहून दुर्लक्ष केले जात आहे का, हे प्रश्न यानिमित्ताने निर्माण झाले आहेत, असेही ते म्हणाले. महाविकास आघाडीची संभाजीनगर येथे सभा होणार असून तणावाच्या परिस्थितीत महाविकास आघाडीच्या नेत्यांशी चर्चा करून सभेबाबत निर्णय घेतला जाईल, असेही पटोले यांनी स्पष्ट केले.

महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर सत्याग्रह

केंद्र आणि राज्य सरकारच्या निषेधार्थ आज ठाण्यातील महात्मा गांधी पुतळ्यासमोर काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी ठाण्यातील कार्यकर्त्यांसह सत्याग्रह आंदोलन करीत पंतप्रधान मोदी आणि राज्य सरकारचा निषेध केला.

अधिक वाचा :

Back to top button