Mahila Samman Yojana : 'हाफ तिकीट'मुळे ताई, माई, आक्कांचा ‘एसटी’ प्रवास जोरात | पुढारी

Mahila Samman Yojana : 'हाफ तिकीट'मुळे ताई, माई, आक्कांचा ‘एसटी’ प्रवास जोरात

विशाळगड; सुभाष पाटील : एसटी महामंडळाची महिलांना अर्धे तिकीट आकारण्याची ‘महिला सन्मान योजना’ एसटीला चांगलीच फायद्याची ठरू लागल्याची आकडेवारी समोर आली आहे. म्हणजेच ताई, माई, आक्कांचा ओढा लालपरीकडे चांगलाच वाढला असल्याचे दिसते. शाहूवाडी तालुक्यात मलकापूर आगारातून गेल्या दहा दिवसात ५८ हजार ६७५ महिला प्रवाशांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. यातून आगाराला सुमारे ११ लाखाचे उत्पन्न मिळाल्याची माहिती आगार व्यवस्थापक सतीश पाटील यांनी दिली. महिलांना आता माहेरी जाण्यापासून ते नातेवाईकांना भेटण्यापर्यंत येणे जाणे स्वस्त झाल्याने महिला योजनेस चांगला प्रतिसाद मिळत आहे. (Mahila Samman Yojana)

एसटी बसमधून महिलांना अर्ध्या तिकीट दरात प्रवास करण्याची ‘महिला सन्मान योजना’ राज्य शासनाने जाहीर केली आणि गेल्या १७ मार्चपासून या योजनेची अंमलबजावणी देखील राज्यात सुरू झाली. केवळ अर्ध्या तिकिटात प्रवास करता येणार असल्यामुळे महिला वर्गाचा प्रचंड मोठा प्रतिसाद या योजनेला मिळत आहे. महिलांसाठी सुरू करण्यात आलेल्या या योजनेनंतर महिलांच्या प्रवासातदेखील वाढ झाल्याचे दिसून आले आहे. (Mahila Samman Yojana)

योजनेच्या दहा दिवसात तालुक्यात तब्बल ५८ हजार ६७५ महिलांनी बसमधून प्रवास केला. रोज प्रवास करणाऱ्या महिलांची संख्या ४ हजार ते सहा हजारांच्या घरात असल्याने आगारात महिला प्रवासासाठी पुढे येत असल्याचे दिसून आले. योजना सुरू होऊन अवघे काही दिवस झाले असताना महिलांचा प्रतिसाद वाढतच असल्याचे दिसते. तालुक्याच्या गावातील बाजारहाट करण्यासाठी दोन आठवडे आड जात होते. परंतु आता दर आठवड्याला जाता येणार आहे. नातेवाईक असल्याने त्यांची भेटही घेता येईल अशा प्रवाशी महिलांच्या प्रतिक्रीया येत आहेत. (Mahila Samman Yojana)

महिला प्रवाशांचा वाढता प्रतिसाद

महिलांना साधी, निमआराम तसेच शिवशाही यासारख्या बसेसमधून प्रवास करता येणार आहे. ६५ वर्षावरील महिलांना यापूर्वीच अर्ध्या तिकिटाची सवलत मिळत होती. आता सर्व महिलांना लाभ होत आहे. शाहूवाडीमधून पहिल्या दिवसापासून या मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळाला. २१ मार्चला तब्बल ६ हजार ३९१ महिलांनी अर्ध्या तिकिटात प्रवास केला. नवीन गाड्यांमधूनही अर्ध्या तिकिटाची सवलत राहणारच आहे. महिला सन्मान योजनेंतर्गत सुरू झालेल्या योजनेत महिला प्रवाशांचा प्रतिसाद वाढतच आहे.

अशी वाढली महिलांची संख्या व उत्पन्न

दिनांक        प्रवासी             उत्पन्न
२० मार्च        ५७८४           १,०३०६६
२१ मार्च        ६३९१            १,१३,१०९
२२ मार्च       ३९४१             ७५,४६९
२३ मार्च       ४९८३             ८७,४६७
२४ मार्च       ५८४२            १,०३,३७८
२५ मार्च      ५३०४               ९८,३७६
२६ मार्च      ४१५९              ८९,०४६
२७ मार्च      ६३३१             १,२२,१५९
२८ मार्च      ६२४७             १,१३,६४३
२९ मार्च      ५६६१             १,०२,५४४
३० मार्च      ४६३२              ९०,०६८
एकूण       ५८,६७५        १०,९८,३२५   

अधिक वाचा :

Back to top button