घटस्थापना : घटस्थापनेने नवरात्रौत्सवास आजपासून प्रारंभ | पुढारी

घटस्थापना : घटस्थापनेने नवरात्रौत्सवास आजपासून प्रारंभ

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात सकाळी 8 वाजून 40 मिनिटांनी घटस्थापना होणार आहे. यानंतर तोफेची सलामी देऊन शारदीय नवरात्रौत्सवास प्रारंभ होईल. याचबरोबर जिल्ह्यातील मंदिरे आणि घरोघरी नवरात्रौत्सवा अंतर्गत घटस्थापना होणार आहे.

कोरोनाच्या संकटामुळे गेल्या सहा महिन्यांहून अधिक काळ बंद असणारी मंदिरे दर्शनासाठी खुली होणार असल्याने याची जय्यत तयारी जिल्हा प्रशासन, पोलिस दल, महापालिका आणि पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या वतीने करण्यात आली आहे. दरम्यान, या संपूर्ण तयारीची पाहणी जिल्हाधिकारी राहुल रेखावार, पोलिसप्रमुख शैलेश बलकवडे, प्रांत वैभव नावडकर, तहसीलदार शीतल मुळे-भामरे, देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे, व्यवस्थापक धनाजी जाधव यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

महाद्वारवरील व्यापार्‍यांना सहकार्य ( घटस्थापना )

नवरात्रौत्सवकाळात महाद्वार रोड परिसरातील व्यापारी व रहिवाशांना सर्वोतोपरी सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिली. यावेळी व्यापारी प्रतिनिधी किरण नकाते, कुलदीप गायकवाड, मनोज बहिरशेठ, पंकज भांबुरे, जयंत गोयानी, दीपक बागल आदी उपस्थित होते.

शहरात 11 ठिकाणी एलईडी स्क्रीनची व्यवस्था करण्यात आली आहे. पार्किंगकरिता 10 ठिकाणी व्यवस्था करण्यात आली आहे.

प्राचीन भारतीय कृषी संस्कृतीतील महत्त्वाचा सण म्हणून ओळखल्या जाणार्‍या नवरात्रौत्सवाची सुरुवात गुरुवारी परंपरेनुसार घटस्थापनेने होत आहे. करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात सकाळी 8 वाजून 40 मिनिटांनी घटस्थापना होणार आहे. यानंतर तोफेच्या सलामीने शारदीय नवरात्रौत्सवास प्रारंभ होईल. याचबरोबर जिल्ह्यातील विविध देव-देवतांच्या मंदिरांत आणि घरोघरी नवरात्रौत्सवाअंतर्गत घटस्थापना होणार आहे. दीड वर्षानंतर मंदिरे दर्शनासाठी खुली होणार असल्याने भाविकांबरोबरच व्यावसायिकांमध्येही उत्साहाचे वातावरण आहे.

जोतिबा, भवानी, टेंबलाई, कात्यायनी मंदिरे सज्ज ( घटस्थापना )

करवीर निवासिनी अंबाबाई, दख्खनचा राजा जोतिबा, जुना राजवाडा येथील तुळजाभवानी मंदिर, टेंबलाई टेकडीवरील त्र्यंबोली मंदिर यासह नवदुर्गा मंदिरांमध्ये नवरात्रौत्सवाची तयारी पूर्ण झाली आहे. नवरात्र उत्सवानिमित्त दि. 7 ते 15 ऑक्टोबर या कालावधीत विविध पारंपरिक धार्मिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

अंबाबाईची पूजा संकल्पना ‘सप्तमातृका’ ( घटस्थापना )

दिनांक                 तिथी               पूजा

7 ऑक्टोबर        प्रतिपदा           ब—ह्माणी
8 ऑक्टो.           द्वितीया            माहेश्वरी
9 ऑक्टो.           तृतीया             युक्त चतुर्थी कौमारी
10 ऑक्टो.         पंचमी              गजारूढ अंबारी
11 ऑक्टो.         षष्ठी                 वैष्णवी
12 ऑक्टो.         सप्तमी             इंद्राणी
13 ऑक्टो.        अष्टमी               महिषासुरमर्दिनी
14 ऑक्टो.         नवमी               चामुंडा
15 ऑक्टो.         दसरा               अश्वारूढ रथातील

Back to top button