नवदुर्गा ः जागृत आदिशक्तीचा जागर - पुढारी

नवदुर्गा ः जागृत आदिशक्तीचा जागर

कोल्हापूर : नंदकुमार मराठे

करवीर निवासिनी श्री अंबाबाई ( नवदुर्गा ) म्हणजे महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी एक पूर्ण पीठ होय. या देवतेच्या सभोवताली असणार्‍या विविध देवतांमुळे या नगरीला एक वेगळी आध्यात्मिक बैठक प्राप्त झाली आहे. देवी एकवीरा, मुक्तांबिका, पद्मावती, प्रियंगाई कमलजा, महाकाली, अनुगामिनी, गजेंद्रलक्ष्मी, श्री लक्ष्मी आदी नवदुर्गांबरोबर ( नवदुर्गा ) त्र्यंबोली, उज्वलांबा, कात्यायनी या तीन वरप्राप्त देवताही तितक्याच महत्त्वपूर्ण. देवांच्या रक्षणासाठी व राक्षसांचा संहार करण्यासाठी वेळोवेळी स्त्री शक्तींनी अवतार घेतले. श्रावणातील प्रत्येक मंगळवारी व शुक्रवारी शहरातील या नवदुर्गा देवींच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी होते.

 

नवदुर्गा
श्री एकांबिका

प्रथम दुर्गा ः श्री एकांबिका (एकवीरादेवी) ( नवदुर्गा )

मार्कंडेय पुराणात नवदुर्गा, काशी क्षेत्रीय नवदुर्गा, नवगौरीचे संदर्भ आढळतात. यामधील वर्णनात एकांबिका ही शक्तिप्रधान देवता आहे. या दुर्गेचे स्वरूप पालकत्वाचे आहे. मनोरथ पूर्ण करणारी, शक्ती गणांतील ही देवता प्रधान देवता म्हणून प्रसिद्ध आहे. रेणुका, यल्लमा, रामजननी अशा विविध नावांनी ही देवता लोकाभिमुख आहे. जमदग्नी ऋषींची पत्नी व भगवान परशुरामांची माता महाशक्ती पीठातील माहूरगडची देवता म्हणून ही देशभर प्रसिद्ध आहे. या देवतेची मुखवट्याची पूजा होते. अनेकांची कुळदेवता असून ती निर्गुण रूपात आढळते.

करवीर नगरीत अंबाबाई मंदिराचे पूर्ण दरवाजाकडील रविवार पेठ परिसरात देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार वाणिज्य महाविद्यालयाजवळ हे मंदिर उभे आहे. या देवतेला यमाई देवी म्हणून संबोधतात. अगस्ती ऋषी आणि लोपामुद्रा यांनी या मंदिराला भेट दिल्याचे प्राचीन संदर्भ आढळतात. स्वयंभू अशी ही तांदळा (शिळा) असून एक हाती उंचीची असून त्यावर रौप्य धातूचा मुखवटा बसविला आहे.

नवदुर्गा
श्री मुक्तांबिका

द्वितीय दुर्गादेवी ः मुक्तांबिका ( नवदुर्गा )

नवदुर्गा या शब्दाची व्याख्या व्यापक आहे. सर्वश्रेष्ठ निर्गुण ब्रह्माच्या शक्तीचे मायारूपाचे स्वरूप, ‘सर्वस्वाधा’ म्हणजे दुर्गा शैलपुत्री, ब—ह्मचारिणी चंद्रघंटा (चामुंडा) स्कंदमाता, कृष्मांडा, कात्यायनी कालरात्री, महागौरी, सिद्धदायिनी अशी नवदुर्गांची विविध रूपे आहेत. कोल्हापुरातील श्री मुकांबीदेवी (मुक्तांबिका).

ही नवदुर्गातील द्वितीय देवता, ज्ञानशक्ती व ज्ञानमय अशी ही देवता, मुक्तास्वरूप असून, ज्ञानलाभ करून संसार चक्रातून भक्तांनी मुक्त होण्यासाठी ही देवता आशीर्वाद देते. श्री अंबाबाई मंदिराच्या पूर्व भागात, मंगळवार पेठेत हे मंदिर आहे. कोल्हापूरच्या ऐतिहासिक साठमारी परिसराजवळ, गोपाळकृष्ण गोखले महाविद्यालयाच्या रस्त्यावर हे छोटेखानी मंदिर आहे. स्वामी विवेकानंदांच्या नावाने येथे विविध धार्मिक, आध्यात्मिक व वर्तमान पत्रांसाठी वाचनालय आहे. एक हात ते दीड हात उंचीची काळ्या पाषाणाची ही मूर्ती चतुर्भूज व बैठी मूर्ती आहे. हत्तींनी दुतर्फा या देवतेवर मस्तकाभिमुख अशा चवर्‍या धरल्या असून, देवीला या चवर्‍यांनी वारा घालून हे हत्ती तिची सेवा करीत आहेत, असे दर्शनी रूप दिसते. या देवतेच्या परिवार देवता म्हणून मुक्तेश्वर महादेव, वराह, नृसिंह, वामन, मत्स्यावतार, कुर्मावतार, भैरवनाथ व काळभैरव आहेत.

 

तृतीय दुर्गादेवी ः पद्मावतीदेवी ( नवदुर्गा )

नवदुर्गांमध्ये पद्मावतीचे स्थान अनन्य स्वरूपाचे आहे. अंबाबाई मंदिराच्या दक्षिणद्वार परिसरात मंगळवार पेठ भागात पद्मावतीचे मंदिर आहे. ग्यानसम—ाज्ञी लता मंगेशकर यांच्या ‘जयप्रभा चित्रीकरण’ स्टुडिओसमोर हे मंदिर आहे. पद्मावती, पद्मांबा व पद्मा अशा विविध नावांनी ही देवता सुपरिचित आहे. या परिसराला ‘पद्माळा’ म्हणून ओळखले जाते. करवीर महात्म्य ग्रंथात हा परिसर पद्मतीर्थ म्हणून सुपरिचित आहे. प्राचीन काळी या पद्मतीर्थाच्या काठावर घोर तपश्चर्या करून नृसिंहदेवास भक्त प्रल्हादाने प्रसन्न केल्याचे संदर्भ आढळतात. या तीर्थातील स्नानाने पितृदोषाचे पाप नष्ट होते. या मंदिरात दोन ते अडीच हात उंचीची चित्ताकर्षक अशी चतुर्भूज मूर्ती आहे.

 

चतुर्थ दुर्गादेवी ः श्री प्रियांगी (प्रत्यंगिरी) ( नवदुर्गा )

अंबाबाईचे प्राणप्रीय स्थान म्हणजे करवीरनगरी. त्यामुळे हे विष्णूंचेही प्रियस्थान आहे. चारी दिशांना तळ्यामध्ये शेषशायी अशा या करवीरनगरीतील ‘फिरंगाई तळे’ म्हणून प्रसिद्ध होते. या तळ्याच्या काठावर श्री प्रियांगी देवता नवदुर्गातील एक देवता म्हणून प्रसिद्ध आहे. या देवतेला प्रत्यंगिरी म्हणूनही संबोधतात. शब्दांचा अपभ—ंश होऊन प्रियांगीचे फिरंगाई असा नामोल्लेख झाला. कोल्हापुरातील श्री अंबाबाई मंदिराच्या दक्षिणेला, मंगळवार पेठ व बुधवार पेठ यांच्या मध्यावर हे मंदिर उभे आहे. या मंदिरातील फिरंगाई तळ्यातील पाण्यात औषधी शक्ती आहे. या पाण्यातील गंधयुक्त व क्षारयुक्त गुणांमुळे खरूज, नायटा, गजकर्ण आदी त्वचारोग बरे होत असल्याचे अनेक वयोवृद्ध भक्त सांगतात. या मंदिरातील मूर्ती उभी असून, चतुर्भूज आहे. मूर्ती उभी असून एक हातभर उंचीची आहे. या मूर्तीला शेंदूर लावला असून, निर्गुण तांदळाशीला आहे. या देवतेचे कानकोबा आणि खोकलोबा अशा परिवार देवता आहेत.

पंचम दुर्गादेवता ः कमलांबा (कमलजा देवी) ( नवदुर्गा )

करवीरनगरीच्या काठावर वरुणतीर्थ आणि कपिलतीर्थाला प्राचीन महत्त्व आहे. या नगरीचा परिसरातील देवदेवतांची वसतिस्थाने म्हणजे श्री अंबाबाईची बलस्थाने आहेत. या दिव्यशक्तिपुरामध्ये अखंड जागृत असे कमलजादेवीचे स्थान आहे. कमला मंदिरातील ही नवदुर्गा कमलांबा नावाने सुपरिचित आहे. कमळावर आरूढ झालेली मूर्ती चतुर्भूज आहे. सुमारे दोन हात उंचीची ही मूर्ती प्रासादिक व नयनरम्य आहे. मूर्ती काळ्या पाषाणाची आहे. वरुणतीर्थामध्ये पूर्वी अनेक कमळपुष्पांचा उगम होता. या तीर्थासमोर पूर्वी लोणारतळे (वीरजतीर्थ) होते. नृसिंह, विठ्ठल-रुक्मिणी आणि महादेव या कमलांबा देवतेच्या परिवार देवता आहेत. हे स्थान विष्णुगया म्हणून प्रसिद्ध आहे.

देवी त्र्यंबुली (टेंबलाई) ( नवदुर्गा )

करवीरनगरीच्या पूर्वेस उंच टेकडीवर ही देवी एका मंदिरात विराजमान आहे. या देवीला त्र्यंबुली, तर कुणी टेंबलाई या नावानेही ओळखतात. प्राचीन काळी या मंदिरानजीक तर्कतीर्थ नावाचे तळे होते. आजही तर्कतीर्थ काही प्रमाणात उपलब्ध असून, त्याला टाकाळा असेही म्हणतात. मूळ मंदिर छोटे असून आत देवीची स्वयंभू मूर्ती उभी आहे. मूर्ती चतुर्भूज असून काळ्या पाषाणाची आहे. मूर्तीची स्थिती श्री अंबाबाई मंदिराकडे पाठ फिरून बसलेली अशी आहे. त्यामागे छोटा इतिहास करवीर माहात्म्य ग्रंथात सापडतो. तिला त्रयमली असेही संबोधतात. प्राचीन काळी कोलासूर राजाचा मुलगा कामाक्ष या नगरीवर युद्धासाठी आला. त्याने योगदंडाची विद्या प्राप्त केली होती. त्याचा पराभव करण्यासाठी अंबाबाईने त्र्यंबुलीला धाडले. त्र्यंबुलीने त्याचा योगदंड हरण करून पराभव केला. त्यानंतर अंबाबाईने विजयोत्सव साजरा केला. त्यात त्र्यंबुलीला आमंत्रण देण्याचे राहिले. तेव्हा त्र्यंबुलीने रुसून अंबाबाईकडे पाठ फिरवली. अंबाबाईच्या लक्षात येताच देवी स्वतः आमंत्रणास गेली; पण त्र्यंबुलीचा रुसवा निघेना. तेव्हा त्र्यंबुलीच्या आज्ञेनुसार अंबाबाईने प्रत्येक पंचमीला तिला भेटण्याचे अभिवचन दिले, अशी पौराणिक कथा आहे. करवीरच्या अनेक भक्तांची ही देवता श्रद्धास्थान आहे. प्रत्येक आषाढ महिन्यात देवीला पंचगंगेच्या पाण्याने स्नान घालण्याचा त्याचबरोबर मंदिराच्या पायरीवर पाणी ओतण्याचा धार्मिक उत्सव असतो.

सप्त दुर्गादेवता ः श्री दुर्गा अनुगामिनी ( नवदुर्गा )

प्राचीन काळी दुर्गासूर नावाच्या राक्षसाने ब—ह्मदेवाची तपश्चर्या करून वर मिळविला की, त्रिभुवनात त्याला पराभूत करणारा पुरुषवीर असणार नाही. इतर राक्षसांना शुक्राचार्यांनी मंत्राने जिवंत केले. दुर्गासूर अजिंक्य झाला. इंद्र, चंद्र, वरुण, यम सर्वांना कैद करून तो देवनगरीचा राजा झाला. ब—ह्मा-विष्णू-महेश शरण गेले. शेवटी जगदंबेने विविध अवतार घेऊन नवविध रूपे घेतली. त्या नवदुर्गा महापराक्रमी होत्या. या दुर्गारूपात देवी अनुगामिनीचा पराक्रम लक्षवेधी होता. करवीर निवासिनी श्री अंबाबाईने या देवतेला रक्षक देवता म्हणून संबोधले. श्री अंबाबाई मंदिराच्या पश्चिम दिशेला ही देवता स्थानापन्न झाली आहे. रंकाळा परिसरात जाऊळाच्या गणपतीजवळील परिसरात हे मंदिर आहे. 6 ते 7 हात उंचीची ही देवता तीन हात रुंद आहे. मूर्तीला सहा हात असून दोन हात गुप्त आहेत. मूर्ती काळ्या पाषाणाची असून तिच्या पदकमलाखाली राक्षस शरण आलेले आढळतात. या मूर्तीच्या उजव्या हातात कमंडलू व डाव्या हातात खडग आहे. मूर्तीच्या एका हातात घंटा असून युद्धाचे वेळी ही देवता घंटानाद करीत असून घंटानादाने राक्षस भीतीने सैरावैरा पळत सुटत. प्रत्येक काळात दैत्यांचा वध करून करवीरात मृत झालेल्या पाप्यास यमबाधा होऊ नये, म्हणून मृतात्म्यांच्या मागेही रक्षणास जाते म्हणून हिला ‘अनुगामिनी’ अशी संज्ञा आहे. परंतु, प्रचलित नावात ती ‘अनुगामिनी’ म्हणून लोकाभिमुख आहे, असे उल्लेख करवीर माहात्म्य ग्रंथाच्या 41 व्या अध्यायात आहेत. म्हसोबा, महादेव, श्री पादुका या परिवार देवता आहेत.

अष्ट दुर्गादेवता ः गजेंद्रलक्ष्मी ( नवदुर्गा )

देवी ही दुर्गा रूपात सिंहारूढ होऊन महिषासुराचा वध करणारी, काली स्वरूपात ती काळ्या स्वरूपात रक्ताने माखलेली, सर्पवेष्टीत, चर्मवेष्टीत, तर काहीवेळा मुंडलमाला (मुंडक्यांची माळ) धारण करणारी, महामायेचे तिचे रूप मोहून टाकणारे आहे. कधी चतुर्भुजा, कधी षष्टभुजा, कधी अष्टभुजा, कधी दशभुजा, तर कधी अष्टादशभुजा स्वरूपात आढळते. अशा दुर्गा रूपातील हत्तीवर आरूढ होणार्‍या गजेंद्रलक्ष्मीचे रूप काही वेगळेच आहे. कोल्हापुरात ठिकठिकाणी गजेंद्रलक्ष्मी मंदिरे आढळतात. पैकी कोल्हापूरच्या प्राचीन काळाची साक्ष देणार्‍या ब—ह्मपुरी भागात कुंभार गल्लीत हे मंदिर आहे. या देवतेला गजांतलक्ष्मी म्हणूनही संबोधतात. काळ्या पाषाणाची ही मूर्ती असून, ती एक हात उंचीची बैठी मूर्ती आहे. मूर्ती चतुर्भुज असून रूप नयनमनोहर आहे. समुद्र मंथनावेळी प्रथम निर्माण झालेली लक्ष्मी म्हणून अष्टदिग्गजाने (हत्तीने) सोंडेत सुवर्ण कलश घेऊन त्यातून अमृतजलाने तिला महामस्तकाभिषेक केला. म्हणून तिला गजेंद्रलक्ष्मी म्हणून ओळखतात. ऐश्वर्याच्या परमावधीचे ती स्वरूप आहे. कोल्हापुरातील हे मंदिर अत्यंत प्राचीन जागृत देवस्थान आहे. श्री गजेंद्रलक्ष्मी कमलारूढ असून, हातामध्ये पद्मपुष्प आहेत. सागरकन्या म्हणूनही ती सुपरिचित आहे. या देवतेच्या सेवेमुळे दारिद—्य, दु:ख दूर होऊन ऐश्वर्य प्राप्त होते, असे उल्लेख गजेंद्रलक्ष्मी स्तोत्रात आढळतात.

नवम दुर्गादेवता ः श्री लक्ष्मी ( नवदुर्गा )

आपल्या सर्वसामान्यांच्या भाषेत देवी म्हणजे स्त्री देवता आणि देवाची पत्नी म्हणजे देवी, असा रूढ समज आहे; परंतु शिवपत्नी पार्वती देवीला देवी म्हणून ओळखतात. पार्वती, उमा, गौरी, हरतालिका, जगदंबा अशी तिची विविध रूपे. तथापि दुष्टांच्या संहारासाठी ती चामुंडा, भैरवी अशा नावाने ओळखली जाऊ लागली. भद्रकाली, खतदंतिका हे तिचे उग्ररूप आहे, तर लक्ष्मी हे तिचे सात्विक व वैभवशाली रूप आहे. कोल्हापुरात श्री अंबाबाई मंदिराच्या पर्वभागात लक्ष्मीतीर्थ नावाचे प्राचीन तीर्थकुंड आहे. या परिसराला हत्तीमहाल संबोधतात. महाराष्ट्र शासनाच्या वजन आणि मापे कार्यालय परिसरात सध्या हे मंदिर असून, लक्ष्मीची मूर्ती अतिप्राचीनता सिद्ध करते. नवदुर्गापैकी एक दुर्गा म्हणून या देवतेची ख्याती असून, दोन हात उंचीची ही बैठी मूर्ती आहे. मूर्ती चतुर्भूज असून तिचे रूप नयनमनोहर असे आहे. दुर्मीळ तत्त्वाचे पूजन व सुखभोग देणारी, मुक्ती देणारी श्री लक्ष्मी या रूपात मूलतत्त्व शक्तीरूपातच सामावली आहे. त्यामुळे या देवतेच्या रूपात लक्ष्मीरूप आढळते. श्रावण मास, आश्विन मासात येथे अनेक भक्त दर्शनासाठी येतात. शहाजी तरुण मंडळाचे अनेक कार्यकर्ते या मंदिराची पूजाअर्चा व देखभाल करतात.

Back to top button