पिंपरी : पोटाची खळगी भरायची की मुलांना शिकवायचं; चिमुरड्यांना शिकविण्यासाठी मजुरांची धडपड

पिंपरी : पोटाची खळगी भरायची की मुलांना शिकवायचं; चिमुरड्यांना शिकविण्यासाठी मजुरांची धडपड
Published on
Updated on

दीपेश सुराणा

पिंपरी : माझा मुलगा खडकीतील शाळेत सातवीला होता. कामानिमित्त पिंपरीत आल्यानंतर त्याची शाळा सुटली. बायकोचे निधन झाल्याने मुलाला पुन्हा शाळेत टाकले नाही. दुसरा मुलगा शिकत नाही. तिसरा मुलगा छोटा आहे. मी मजुरी काम करू, मुलांना सांभाळू, की त्यांना शाळेत टाकू, अशी व्यथा मजुरी काम करणारे संजय काळे यांनी मांडली. बिगारी कामगार, बांधकाम मजूर, घरकाम करणार्‍या महिला यांची पोटाची खळगी भरण्यासाठी दररोजची धावपळ सुरू आहे. त्यामध्ये काही मुलांचे शिक्षण अर्धवट राहते. तर, काही मजूर मात्र आपल्या मुलांना जिद्दीने शिकवताना दिसत आहेत.

शहरात स्थलांतरांचे प्रमाण जास्त
पिंपरी-चिंचवड शहरामध्ये नोकरी-व्यवसायानिमित्त विदर्भ, मराठवाडा या पट्ट्यातून स्थलांतर करुन येणार्‍या कामगार, मजुरांचे प्रमाण मोठे आहे. त्याचप्रमाणे, कर्नाटक, उत्तर प्रदेश आदी ठिकाणावरुन येणार्‍यांमध्ये बांधकाम मजुरांचे प्रमाण जास्त आहे. बिगारी कामगारांना दररोज 300 ते 400 रुपये मजुरी मिळते. एका घरातील नवरा-बायको अशा दोघांनी काम केल्यानंतर त्यांचा चरितार्थ चालतो. ज्या घरात एकटीच कमावती व्यक्ती असेल तिथे घर चालविणे ही तारेवरची कसरत असते. त्याचप्रमाणे, दररोज काम मिळेल याची खात्री नसते. शहरातील विविध मोकळ्या मैदानांवर बिगारी कामगार, बांधकाम मजूर, वीटभट्टी कामगार हे पाल ठोकून राहतात. नेहरुनगर येथील मैदानावर छोट्या-छोट्या झोपड्यांमध्ये राहत असलेल्या काही कष्टकर्‍यांशी 'दैनिक पुढारी'च्या प्रतिनिधीने संवाद साधला. त्यांच्या मुलांचे शिक्षण होत आहे का, याची माहिती जाणून घेतली.

मुलाचे शिक्षण अर्धवट सुटले
उस्मानाबाद येथून आलेले आणि मजुरी काम करणारे संजय काळे हे तीन मुलांसह नेहरुनगर येथे राहण्यास आहेत. त्यांचा एक मुलगा खडकीतील शाळेत सातवीला होता. पिंपरीत आल्यानंतर त्याचे शिक्षण सुटले. काळे यांच्या पत्नीचे निधन झाल्यामुळे त्यांनी पुन्हा त्याला शाळेत टाकले नाही. दुसरा मुलगा शिकत नाही. सर्वात छोट्या मुलाचे अजून वय कमी आहे. मी मुलांना सांभाळू, मजुरी काम करू, की त्यांना शाळेत टाकू, असा सवाल ते उपस्थित करतात. सर्वांत छोटा मुलगा सहा वर्षांचा झाल्यानंतर त्याला मात्र ते पहिलीत टाकणार आहे.

नातवांना शिकवणार
फुलाबाई काळे या नेहरुनगर परिसरातील सोसायट्यांमध्ये साफसफाईचे काम करतात. त्यांच्या नातवांना त्यांनी नेहरुनगर येथील महापालिकेच्या शाळेत टाकले आहे. लोकांकडून मिळणारी धान्य स्वरुपातील मदत त्यांना घर चालविण्यासाठी उपयुक्त ठरते. गेल्या 10 ते 15 वर्षांपासून त्या येथे राहण्यास आहेत. नातवांचे शिक्षण झाले तर त्यांचे चांगले होईल, या विचाराने त्या त्यांचे शिक्षण करीत आहेत.

मुले शिकली तर चांगले होईल
बिगारी काम करणारे सुरेश गजरे यांचा एक मुलगा सहावीला तर, दुसरा मुलगा चौथीत शिकत आहे. विठ्ठलनगर येथील मनपा शाळेत ही मुले शिकण्यासाठी जातात. बिगारी कामातून त्यांना दररोज 300 ते 400 रुपये मजुरी मिळते. त्यातच त्यांचे घर चालते. शाळेतून वह्या-पुस्तके, गणवेश मिळतो. मुलांना शाळेत सोडण्यासाठी दररोज अर्धा किलोमीटर पायपीट करावी लागते. मुले शिकली तर त्यांचे चांगले होईल. त्यांना आमच्यासारखे कष्ट करावे लागणार नाही. याच विचारातून त्यांना शिकवित असल्याचे ते आवर्जून नमूद करतात.

शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण कागदावरच
महापालिकेकडून दरवर्षी शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण केले जाते. त्यातील किती मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले याची आकडेवारी दिली जाते. मात्र, हे कागदावरच दाखविले जाते, असे मत कष्टकरी-कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी व्यक्त केले. ते म्हणाले, की मुलांच्या पालकांमध्ये शिक्षणाविषयी जागरुकता निर्माण केली जात नाही. कामगारांना ते राहत असलेल्या ठिकाणीच कामाची उपलब्धता झाली तर त्यांना कामासाठी सतत स्थलांतर करावे लागणार नाही. शासनाने बांधकाम मजूरांच्या मुलांच्या शिष्यवृत्ती सुरू केली आहे. त्याच धर्तीवर सुरक्षारक्षक, कंत्राटी कामगार, घरेलु कामगारांच्या मुलांना शिष्यवृत्ती मिळायला हवी. त्यामुळे त्यांना शाळेत घालण्यासाठी प्रोत्साहन मिळेल.

बांधकाम मजूर, वीटभट्टी कामगार, कंपन्यांमध्ये माळी काम करणारे कामगार, सुरक्षारक्षक आदींची 80 टक्के मुले आमच्या शाळेत शिक्षण घेत आहेत. चांदा, गवारवाडी, बोडकेवाडी आदी परिसरातील ही मुले आहेत. काही मुले पायपीट करीत, काही सायकलवर तर काही रिक्षाने शाळेत येतात. या मुलांना आवश्यक शैक्षणिक साहित्य, शालेय शुल्क आदींसाठी सामाजिक संस्थांकडून मदत करण्यात येते.

                                – अंबादास रोडे, मुख्याध्यापक, न्यू इंग्लिश स्कूल, माण

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news