कोल्हापूर : नृसिंहवाडी ग्रामपंचायतीचा अतिक्रमणाबाबत दुकानदारांना इशारा | पुढारी

कोल्हापूर : नृसिंहवाडी ग्रामपंचायतीचा अतिक्रमणाबाबत दुकानदारांना इशारा

नृसिंहवाडी; पुढारी वृत्तसेवा : श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील दत्त मंदिर परिसरातील दुकानदारांनी अतिक्रमण स्वतःहून काढून घ्यावे, अन्यथा कडक कारवाई केली जाईल, असा इशारा नृसिंहवाडी ग्रामपंचायतीकडून देण्यात आला आहे. दुकानदारांच्या दबावाला बळी न पडता ग्रामपंचायतीने कठोर भूमिका घ्यावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात आली होती. याबाबत आता ग्रामपंचायतकडून आक्रमक भूमिका घेण्यात आली आहे. दुकानदारांनी व उपहारगृह चालकांनी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

नृसिहवाडी येथे दररोज हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात. पण मंदिर परिसरात दुकानदारांनी केलेल्या अतिक्रमणामुळे भाविकांना ये-जा करताना अडथळे निर्माण होत आहेत. अनेक विक्रेत्यांनी पुजाविक्रीचे साहित्य फलक मुख्य मार्गात ठेवले आहेत. विठ्ठलमंदिर परिसर व मंदिराकडे जाण्याच्या मार्गावर उपहारगृहांनी तर सीमाच ओलांडली आहे. अतिक्रमणामुळे येथील रस्ते बंद होण्याच्या मार्गावर आहेत. यापूर्वी ग्रामपंचायतीने कारवाई करून काही दुकानदारांचे साहित्य जप्त केले होते. पण दोन-तीन दिवस कारवाई केल्यानंतर ती देखील थंडावली. त्यामुळे पुन्हा कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

वाढत्या अतिक्रमणाबाबत आम्ही ठोस कारवाई करणार आहोत. तत्पूर्वी नागरिकांनी स्वेच्छेने अतिक्रमण काढून घ्यावे, अन्यथा आम्हाला कडक भूमिका घ्यावी लागेल.
-अमोल विभुते, उपसरपंच, श्री क्षेत्र नृसिंहवाडी

हेही वाचा : 

Back to top button