

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : राज्यात राष्ट्रपती राजवट लागण्याच्या पाठीमागे कोण होते, कोणाच्या सांगण्यावरून लागली, याचा खुलासा शरद पवार यांनी करावा, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. राष्ट्रपती राजवट उठविण्यासाठी भाजपसोबत पहाटेचा शपथविधी केला, अशी कबुली राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी पुणे येथे बोलताना दिली. आता त्यांच्या या वक्तव्यावर फडणवीस यांनी काही सवाल उपस्थित केले आहेत.
बरे झाले, आता पवार यांनी स्वतःच या विषयावर खुलासा केला आहे. आता ते एवढे बोलले आहेत तर मग राज्यात राष्ट्रपती राजवट का लागली, त्या पाठीमागे कोण होते, कोणाच्या सांगण्यावरून राष्ट्रपती राजवट लागली, याबाबतही पवार यांनी बोलावे, असे फडणवीस यांनी सांगितले. राष्ट्रपती राजवट लागू करण्यामागचे नेमके कारण काय होते, अशा सगळ्या गोष्टींचाही ते खुलासा करतील ही माझी अपेक्षा आहे, असेही ते म्हणाले. या सगळ्या कड्या जोडल्या तर अनेक गोष्टी आणखी स्पष्ट होतील, अशी मार्मिक टिप्पणी फडणवीस यांनी केली.