हरवत चाललेले खेळ अन् आयुष्य! तंत्रज्ञानाच्या युगात वेगाने प्रगती, पण जीवन बनलं धकाधकीचं | पुढारी

हरवत चाललेले खेळ अन् आयुष्य! तंत्रज्ञानाच्या युगात वेगाने प्रगती, पण जीवन बनलं धकाधकीचं

ढोरजळगाव : आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात मानव खूप वेगाने प्रगती करत आहे आणि याच तंत्रज्ञानाच्या मदतीने यशाची शिखरे पादाक्रांत करत चालला आहे. मात्र, त्याचबरोबर मनुष्याचं आयुष्य धकाधकीचं अन् धावपळीचं झालं आहे. तंत्रज्ञानाच्या वापरामुळे मानव अवघड कामे घरबसल्या करू लागला आहे. सोशल मीडियामुळे मानवाला प्रसिद्धी मिळाली.

ज्या कामासाठी दिवस दिवस जायचा, ते काम अगदी सहज क्षणात होऊ लागलं आहे. मोबाईलचं बटन दाबले की सेकंदात संदेश दुसर्‍याला जातो. पण, याच धावपळीच्या अन् तंत्रज्ञानाच्या युगात आपण आयुष्यात काहीतरी हरवत चाललो आहोत, याचा विसर मानवाला पडत चालला आहे. ते म्हणजे हरवत चाललेले खेळ आणि हरवत चाललेले आयुष्य!

पूर्वी गावाकडे अनेक प्रकारचे खेळले जायचे. बालपणीचे सवंगडी एकत्र यायचे, रानावनात बागडणे, नदीच्या पाण्यात पोहणे, विटीदांडू, कबड्डी, सुरपारंबी, आट्यापाट्या, लिंगोरच्या, गोट्या, लंगडी तसेच अलीकडच्या काळातील क्रिकेट, असे खेळ खेळले जायचे. यातून शरीराला व्यायाम तर व्हायचाच, परंतु बालमित्रांमधील मैत्री अधिक घट्ट व्हायची, मने एकत्रित बांधली जायची.

उन्हाळ्याच्या सुट्टीत दिवसभर बाहेर खेळल्यामुळे घरी आईचा मारही मुलांना भेटायचा. मात्र, काळ बदलत गेला, मुलांच्या आवडीनिवडीही बदलल्या. जी मुलं दिवसभर उन्हामध्ये लगोरी खेळत होती, तीच मुलं तासन्तास मोबाईलवर पब्जी खेळू लागली. मैदानापेक्षा मोबाईलवरचा खेळ त्यांना जास्त आवडायला लागला अन् मुलं मोबाईलसाठी वेडी झाली.

त्या मोबाईलचं आणि इंटरनेटचं मुलांना इतका वेड लागलं आहे की, आजूबाजूला काय चाललंय याकडं सुद्धा त्यांचं लक्ष राहिलेलं नाही. कार्टून गेमच्या खोट्या जगात मुलं बंदिस्त झाली. याचा परिणाम असा झाला की, मुला-मुलांमधील संवाद थांबला. मैत्रीचं नातं तर दूर, साधं एकमेकांशी बोलायला वेळ राहिला नाही. एक काळ असा होता की, आई-वडील मुलांना दिवसभर खेळायला जातो, म्हणून मारायचे आणि आज खेळत का नाही, म्हणून मारतात!

कोरोनानंतर तर दुष्काळामध्ये तेरावा आल्यासारखीच परिस्थिती झाली. ऑनलाईन शिक्षण पद्धतीचा मार्ग निघाला अन् उरल्यासुरल्या घरातही मोबाईलने अतिक्रमण केलं. याचा परिणाम असा झाला की, शिक्षण राहिलं बाजूला, पण मोबाईलचं व्यसन मुलांना जडवून गेलं. कार्टून गेम्स, यू ट्यूब, पब्जी या खेळांच्या आहारी मुलं गेली अन् खर्‍या आयुष्यातील खेळ विसरली. ती परत त्यांकडं वळतील का, हाच खरा प्रश्न आहे.

पारंपरिक खेळ लोप पावणार!
गावाकडील संस्कृती, पारंपरिक खेळ काळाच्या ओघात लोप पावण्याच्या मार्गावर आहेत. मोबाईलच्या आभासी युगातून बाहेर काढून मुलांना खेळांच्या मैदानातील आनंद परत मिळवून देण्याची गरज आता निर्माण झालेली आहे.

Back to top button