केडीसीसीमधून घेतलेल्या बोगस कर्जाची सात दिवसांत माहिती द्या, अन्यथा… : किरीट सोमय्या यांचे मुश्रीफांना आव्हान | पुढारी

केडीसीसीमधून घेतलेल्या बोगस कर्जाची सात दिवसांत माहिती द्या, अन्यथा... : किरीट सोमय्या यांचे मुश्रीफांना आव्हान

पुढारी ऑनलाईन डेस्क : राष्ट्रवादीचे नेते आमदार हसन मुश्रीफ परिवाराचा घोटाळा ५०० कोटींहून अधिक आहे. शेतकऱ्यांना लुटण्यासाठी मुश्रीफांनी बँकेलाही सोडलं नाही. कोल्हापूर जिल्हा बँकेतून मुश्रीफांनी किती बोगस कर्ज घेतले, याची माहिती सात दिवसात द्यावी. आकडा जाहिर तुम्ही करा, अन्यथा आम्ही जाहीर करतो, असे आव्हान भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी आमदार हसन मुश्रीफ यांना दिले आहे. सोमय्या आज (दि. २३) कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

भाजपच्या कार्यकर्त्यांनी शक्तीप्रदर्शन करत किरीट सोमय्या यांचे आज कोल्हापूरात स्वागत केले. कोल्हापूरात दाखल होताच त्यांनी मुश्रीफ यांच्यावर आरोप केले. सोमय्या म्हणाले, कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत मुश्रीफ यांनी घोटाळा केला आहे. त्यांनी संताजी घोरपडे साखर कारखान्याला लुटलं. त्यांची सर्व बाजूंनी चौकशी सुरू आहे. त्यांच्या परिवाराचा १५८ कोटींचा घोटाळा दिसत होता. पण ५०० कोटींचे आकडे बाहेर येत आहेत. शेतकऱ्यांना लुटण्यासाठी त्यांनी बँकेलाही सोडलं नाही, असा आरोप त्यांनी केला.

सोमय्या पुढे म्हणाले की, कोल्हापूर जिल्हा बँकेतून मुश्रीफ यांनी किती बोगस कर्ज घेतले याची माहिती सात दिवसात द्यावी. टॉप कर्जदारांची नावे जाहीर करावीत. मुश्रीफ, त्यांचा परिवार आणि त्यांच्या कंपन्या यासंदर्भात आयकर विभागाने धाडी घातल्या होत्या.  कोल्हापूर जिल्ह्याशी संबंधीत कोणीही काळजी करण्याची गरज नाही. शेतकऱ्यांना पुढे करून चौकशी थांबविण्याचा प्रयत्न कोणी करत असेल तरी अशा प्रकारची कारवाई थांबत नसते. मुश्रीफांनी केलेल्या घोटाळ्यांची चौकशी आणि कारवाई सुरू राहणार, असे सोमय्या यांनी म्हटले आहे.

हेही वाचा :

Back to top button