ऊस परिषद : राजू शेट्टींकडून उस परिषदेची तारीख जाहीर | पुढारी

ऊस परिषद : राजू शेट्टींकडून उस परिषदेची तारीख जाहीर

कोल्हापूर; पुढारी ऑनलाईन : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने घेण्यात येणाऱ्या ऊस परिषदेची तारीख ठरली आहे. १९ ऑक्टोबर रोजी जयसिंगपूर येथे विक्रमसिंह मैदानात उस परिषद घेण्यात येणार आहे.

मागील वर्षी कोरोनामुळे ही ऊस परिषद ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आली होती. परंतु, यंदाची उस परिषद खुल्या मैदानात घेतली जाणार असल्याचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात २० वी ऊस परिषद होणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.

शेतकऱ्यांना ऊसाची एफआरपी एक रकमी मिळावी म्हणून राजू शेट्टी यांनी आक्रमक पावित्रा घेतला आहे. ७ ऑक्टोबरपासून राज्यात ‘जागर एफआरपी’चा हे आंदोलन करणार असल्याचे राजू शेट्टी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे. तसेच आमचा दसरा कडवट झाला तर राज्यातील एकाही मंत्र्याची दिवाळी गोड होऊ देणार नाही, असा इशाराही राजू शेट्टी यांनी दिला.

यावेळी शेट्टी पुढे म्हणाले, येत्या 7 ऑक्टोबरपासून राज्यात जागर एफआरपीचा हे आंदोलन छेडण्यात येईल. आराधना शक्तिस्थळापासून हे आंदोलन सुरू करू, असे शेट्टी म्हणाले. यावेळी त्यांनी पूरपरिस्थितीवरूनही राज्य सरकारवर टीका केली. पूरग्रस्तांना अद्यापही मदत करण्यात आली नाही.

केंद्र व राज्य सरकारकडून एकरकमी एफआरपीची रक्कम तीन टप्प्यात देण्याचा घाट घातला आहे. या विरोधात राजू शेट्टी यांनी रस्त्यावरची लढाई करणार असल्याचे सांगितले आहे. राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने एक अभिनव आंदोलन छेडले आहे.

एफआरपीच्या तुकडी करणाविरोधात एका टोल फ्री क्रमांकावर मिस्डकॉल देण्याचे आवाहन राजू शेट्टी यांनी केले होते. ही मोहिम सुरू होवून तीन दिवस झाला असून सव्वादोन लाख शेतकर्‍यांनी मिस्डकॉल दिला आहे.

Back to top button