नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : NEET EXAM : वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेतल्या जाणार्या नीट परिक्षेचा पेपर आधीच फुटला होता. त्यामुळे गत 12 सप्टेंबरला झालेली नीट परीक्षा रद्द करावी, अशा विनंतीची याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाली आहे.
पेपरफुटीच्या प्रकरणात जे कोचिंग सेंटर्स आणि पेपर सोडविणारी टोळी सापडली आहे, त्यांच्याविरोधात सीबीआयतर्फे गुन्हा दाखल करावा, असे याचिकेत नमूद करण्यात आले आहे.
जोवर सदर याचिकेचा निकाल लागत नाही, तोवर नीट परिक्षेचा NEET EXAM निकाल जाहीर केला जाऊ नये तसेच पुन्हा नव्याने परिक्षा घेतली जावी. परिक्षेच्या अनुषंगाने सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात यावी, अशी विनंतीही याचिकेत करण्यात आली आहे.
पेपरफुटीचे प्रकरण गंभीर असून सीबीआय तसेच राजस्थान आणि उत्तर प्रदेशच्या पोलिस महासंचालकांकडून यावर एका आठवड्यात उत्तर मागविण्यासाठी निर्देश दिले जावेत, अशी मागणी याचिकाकर्त्या विद्यार्थ्यांनी केली आहे. हुशार आणि अभ्यासू विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन नीट परिक्षा घेणे आवश्यक आहे, असेही याचिकेत म्हटले आहे.
ज्या दिवशी नीट परीक्षा होणार होती, त्याचदिवशी सीबीआयने चार आरोपींसह काही अन्य लोकांविरोधात गुन्हा दाखल केला होता. बनावट विद्यार्थ्यांना परिक्षेस बसवून फसवणूक करण्यात आली तसेच डमी विद्यार्थी बसविण्यासाठी कोचिंग सेंटर्सच्या टोळ्यांकडून प्रत्येक उमेदवारांकडून प्रत्येकी पन्नास लाख रुपये घेण्यात आल्याचे सीबीआयने एफआयआरमध्ये नमूद केले होते.
याआधीही 2015 मध्ये जेव्हा सीबीएसईमार्फत घेण्यात आलेल्या अखिल भारतीय प्री मेडिकल टेस्टचा पेपर फुटला होता, त्यावेळी न्यायालयाने परीक्षा पुन्हा घेण्याचा आदेश दिला होता, असा संदर्भ याचिकेत देण्यात आला आहे.
हे ही वाचलं का?
https://youtu.be/aJgmIikueY8