कर्मवीर भाऊराव पाटील जंयतीविशेष : आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार | पुढारी

कर्मवीर भाऊराव पाटील जंयतीविशेष : आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार

एका दलित वर्गातील गरीब मुलास आपल्या राहत्या घरी आश्रय देऊन कर्मवीर अण्णांनी ज्ञानदानाची गंगोत्री सुरु केली. आज या गंगोत्रीचा नेत्रदीपक विस्तार होऊन तिला महासागराचे रुप आले आहे. लाखो मुला- मुलींना या ज्ञानगंगेतून स्वत:चे जीवनपुष्प फुलविण्याचे भाग्य लाभते आहे. शिक्षणाची पाणपोई गरिबांच्या झोपडीपर्यंत पोहोचविणारे, शिक्षणप्रसाराचे अग्रदूत कर्मवीर भाऊराव पाटील यांची बुधवारी जयंती साजरी होत आहे. बहुजनसेवक कर्मवीर अण्णांच्या कार्याचे महात्म्य जाणून घेण्याचा हा प्रयत्न..!

भारत सरकारने २२ सप्टेंबर १९८६  ते सप्टेंबर १९८७  हे वर्ष डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील जन्मशताब्दी वर्ष जाहीर करून कर्मवीरांनी बहुजन समाजासाठी केलेले कार्य संपूर्ण भारतभर पोहोचविण्याचे कार्य केले.

महाराष्ट्राच्या जडणघडणीत अनेक ख्यातनाम व्यक्तींचा समर्थ सहयोग लाभला व ज्यांच्या निष्काम आणि निरलस सेवेने शिक्षण प्रसारातून जनजागृतीबरोबर समाजात वैचारिक क्रांती घडत गेली. अशा ध्येयवादी, दूरदृष्टीच्या व क्रियाशील तेजस्वी पुरुषांत कर्मवीर भाऊराव पाटील यांचा अग्रक्रमाने समावेश होतो.

‘स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद’ हे जाणून शिक्षण हाच जनजागृतीचा आणि सर्वांगीण विकासक्रांतीचा पाया आहे, हे ओळखून कर्मवीर अण्णांनी निरपेक्ष भावनेने शिक्षण क्षेत्रात काम केले. या कामाला भारताच्याच नव्हे तर जगाच्या इतिहासातही तोड नाही. संकुचित स्वार्थावर पाणी सोडून व्यापक हिताची भावना समाजात आली तरच समाजसुधारणा होते.

नीतीमूल्यांचा त्यामध्ये विकास होतो. स्वत:च्या संसाराची होळी करुन आयुष्यभर दीनदलितांसाठी, अठरा पगड जातींसाठी शिक्षण देणारा हा महामानव बहुजन समाजासाठी कर्मवीर ठरला.

कर्मवीर अण्णांचे शैक्षणिक कार्य म्हणजे तत्कालीन परिस्थितीत सूर्योदय होता. शिक्षणाविना निर्माण झालेल्या अज्ञानाचा गैरफायदा बर्‍याच संधीसाधूंनी घेतला. कर्मवीरअण्णांनी ज्यावेळी ग्रामीण भागात शाळा, महाविद्यालये, वसतिगृहे स्थापन केली. त्यातून खेड्यापाड्यात अज्ञानरुपी चिखलात दडलेली सुकमळे वर आली व त्यांची महाराष्ट्राचा किंबहुना संपूर्ण बहुजन समाजाचा रथ ओढण्यास मदत झाली.

बहुजन समाजातील गोरगरिबांचे अश्रू पुसतो व त्यांना जीवन उभारण्यासाठी अहोरात्र झटत असतो तोच शेवटी कर्मवीर ठरतो. भाऊराव नेहमी म्हणत, शिक्षण संस्था काढताना शिक्षणाची गंगा ग्रामीण भागात नेण्याची गरज आहे. यामध्ये सेवक नेमताना जात, पात, गोत व पंथ पहावयाचा नाही. म्हणूनच भाऊरावांनी पहिल्यादा समाजमंदिरात ज्ञानाचा गजर सुरु केला.

भाऊरावांचे जीवन फार साध्या पद्धतीचे होते. सकाळी शिळी भाकरी, तेल, तिखट, कांदा, भुईमुगाच्या शेंगा हा अण्णांचा आहार असे. संस्थेसाठी पैसा मिळविण्यासाठी त्यांनी आपले तत्व व सत्व कधीही सोडले नाही. तत्व विकून तर पैसा कधीच मिळविला नाही. ते सतत म्हणत की, तत्व, सत्व विकून पैसा जर मिळाला तर भाऊराव मेला.

पैशांसाठी थांबला तो संपला. त्यांनी स्वतःच्या आयुष्यात सामर्थ्यवान माणसे निर्माण केली. मन में होय सो वचन उचरिये । वचन होय सो तन सो करिये। लिहिलेला शब्द खोडणार नाही, उच्चारलेला शब्द फिरवणार नाही आणि पुढे टाकलेले पाऊल मागे घेणार नाही, अशी जिद्द व चिकाटी बाळगणारे भाऊराव होते.

अन्यायाविरुद्ध बंड पुकारणे, स्वातंत्र्य, समता व बंधूतेचा समाजात आविष्कार करणे, सम्यक ज्ञान, सम्यक दर्शन व सम्यक चारित्र या त्रिरत्नांची सांगड घालणे, जिद्द, चिकाटी, दृढनिर्धार, सत्य, संयम, त्याग या गुणांची जोपासना करणे, साधुत्वाची जोपासना करणे, असा हा आधुनिक महाराष्ट्राचा कार्ल मार्क्स, रयतेचा वाली, मेरूपर्वतासारखा वटवृक्ष ठरला.

आज त्या वटवृक्षाच्या छायेखाली लाखो विद्यार्थी ज्ञानगंगा घेत आहेत. एका ठिकाणी कवि असे म्हणतो की,

त्या चार भिंतीवर विलसे दिव्य समाधी, या रयतपुरीचा राजघाट हा त्यागी, ही मूर्ती देवो सतत स्फूर्ति विरांगी, स्वर्गस्थ सुरांची पुष्पवृष्टि दिनरात. तो अमर जाहला कर्मवीर जगतात.॥

थोर पुरुषांचा जन्म जेथे होतो, तेथे जंगलाचे मंगल होते. हा न्याय पुन्हा एकदा खरा ठरला सद्गुरू गाडगेबाबांचे चरणरज जेथे पडले, तेथेच आज अण्णांची समाधी आहे.भावी पिढ्यांना अण्णांची विचारमूर्ती शाश्वत सत्याचा मार्ग दाखवित राहील, याची मला खात्री वाटते. अशी ही प्रकाश देणारी पणती अधिक प्रकर्षाने तेवत राहो, हीच ईश्वर चरणी प्रार्थना !

-सुरेश चौगले (संस्थापक, सन्मती संस्कार मंच)

हेही वाचलंत का? 

 

 

 

 

Back to top button