कोल्हापूर : फराळे साखर कारखान्याची विक्री होणार? गळीत हंगाम रखडला, हजारो रोजगार बुडाले | पुढारी

कोल्हापूर : फराळे साखर कारखान्याची विक्री होणार? गळीत हंगाम रखडला, हजारो रोजगार बुडाले

गुडाळ (आशिष ल. पाटील) : राधानगरी तालुक्यात आठ वर्षांपूर्वी सुरू झालेला पहिला आणि एकमेव साखर कारखाना असलेल्या फराळे येथील रिलायबल शुगर अँड डिस्टिलरी पॉवर लि. कारखाना यावर्षीचा गळीत हंगाम सुरू करू शकला नाही. त्यामुळे तालुक्यातील हजारो रोजगार बुडाले असून परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना कार्यक्षेत्राबाहेर ऊस घालवण्यासाठी धावा-धाव करावी लागणार आहे.

दरम्यान, साखर कारखाना व्यवस्थापन हा कारखाना अन्य कंपनीला चालविण्यासाठी अथवा विक्री करणार असल्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची तसेच तोडणी – ओढणी कंत्राटदारांची थकीत देणी, सवलतीची थकीत साखर, कामगारांचे थकीत पगार आणि सेवेची हमी देण्याची जबाबदारी नव्या व्यवस्थापनाने घ्यावी. यासाठी तालुक्यातील लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने खबरदारी घ्यावी. अन्यथा या मुद्द्यावरून चंदगड आणि गडहिंग्लज साखर कारखाना परिसरात होत असलेल्या संघर्षाची येथेही पुनरावृत्ती होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

स्वर्गीय शंकरराव महाडिक यांनी 1994 साली फराळे येथे महाडिक शुगर या नावाने खाजगी साखर कारखान्याची स्थापना केली. 1996 साली कारखान्याची उभारणी सुरू झाली. मात्र दहा वर्षे अर्धवट स्थितीत रेंगाळली आणि नंतर काम ठप्प झाले. 2011 च्या दरम्यान रायगडचे आमदार जयंत पाटील यांच्या रिलायबल शुगर अँड डिस्टिलरी पॉवर या कंपनीने हा कारखाना विकत घेऊन अर्धवट स्थितीतील कारखान्याची उभारणी पूर्ण केली. 2014 साली प्रत्यक्षात गळीत हंगाम सुरू झाला आणि तालुक्यात खाजगी तत्त्वावर का होईना साखर कारखान्याच्या रूपाने एक मोठा उद्योग उभा राहिला.

कारखान्याच्या माध्यमातून अनेक नोकऱ्या आणि अन्य रोजगार उपलब्ध झाले. होतकरू तरुणांनी ऊस पुरवठा करण्यासाठी ट्रॅक्टर, ट्रक खरेदी केले. प्रतिदिन 2800 मेट्रिक टन क्रशिंग करणाऱ्या या कारखान्यामुळे परिसरातील ऊस पिकाचे लवकर गाळप होऊ लागले. अनेक शेतकऱ्यांना दुबार पिके घेता येऊ लागली. मात्र अलीकडील दोन-तीन वर्षात कारखान्याचा आर्थिक ताळेबंद बिघडल्याची चर्चा सुरू झाली. ऊस बिलांना विलंब होऊ लागला आणि यावर्षी तर हंगाम सुरू करण्यास व्यवस्थापनाने असमर्थता दर्शविली. गेल्या गळीत हंगामातील सवलतीची साखर अद्यापही शेतकऱ्यांना मिळालेली नाही. कामगारांचे चार महिन्यांचे पगार थकीत असल्याचे तसेच तोडणी – ओढणी कंत्राटदारांची बिले आणि कमिशन डिपॉझिट देणे बाकी असल्याचे सांगण्यात येते. 2017 पासून कामगारांच्या प्रॉव्हिडंट फंडाचा भरणाही झाला नसल्याचे कामगारांकडून बोलले जात आहे.

याप्रश्नी ऊस तोडणी – ओढणी कंत्राटदार आणि कामगारांचे एक शिष्टमंडळ लवकरच तालुक्याचे आमदार प्रकाश आबीटकर तसेच राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए.वाय.पाटील यांना भेटणार असल्याची माहिती मिळत आहे.

हेही वाचा :

Back to top button