कोल्हापूर : सत्तर लाखांची पाणी योजना गेली कुठे?, भेंडवडे पूरग्रस्त बचाव कृती समितीची गटविकास अधिकाऱ्यांना विचारणा | पुढारी

कोल्हापूर : सत्तर लाखांची पाणी योजना गेली कुठे?, भेंडवडे पूरग्रस्त बचाव कृती समितीची गटविकास अधिकाऱ्यांना विचारणा

हातकणंगले; पुढारी वृत्तसेवा : हातकणंगले तालुक्यातील भेंडवडे येथील ७० लाख रूपयांची जलशुद्धीकरण पाणीपुरवठा योजना अस्तित्वात येवून तीन वर्षे उलटली. परंतु अद्यापही नागरिकांना शुद्ध पाणी मिळालेले नाही. त्यामुळे ७० लाखांचे जलशुद्धीकरण केंद्र गेले तरी कोठे? या योजनेची चौकशी व्हावी, अशी मागणी भेंडवडे पूरग्रस्त बचाव कृती समितीच्यावतीने करण्यात आली. याबाबतचे निवेदन गटविकास अधिकारी शबाना मोकाशी यांना दिले. यावेळी गटविकास अधिकारी मोकाशी यांनी योजनेचा सखोल अहवाल लवकरात लवकर मागितला जाईल, ग्रामस्थांना शुद्ध पाणी देण्याबाबत निर्णय घेऊ, तसेच संबंधितांवर कारवाई करू, असे आश्वासन दिले.

भेंडवडे येथे २०१८-१९ साली ७० लाख रूपये खर्च करून जलशुद्धीकरण केंद्राची निर्मिती करण्यात आली. या जलशुद्धीकरण केंद्राचे उद्घाटनही केले. परंतु या योजनेचे पाणी ग्रामस्थांना मिळाले नाही. पुरबाधित गाव असल्याने दूषीत पाणी येथील नदीमध्ये मिसळले होते. यामुळे गावामध्ये आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला होता. ७० लाखांची योजना असतानाही दूषित पाणी मिळत आसल्याने नगरिकांमधून प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला जात आहे.

भेंडवडे ग्रामपंचायत व ग्रामविकास अधिकारी यांना चौकशीचे आदेश देऊन संबंधितांवर कारवाई करावी, त्वरीत पाणी पुरवठा योजना सुरू करावी, अशी मागणी भेंडवडे पूरग्रस्त बचाव कृती समितीच्या वतीने गटविकास अधिकारी मोकाशी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी कृती समितीचे अध्यक्ष अशोक एडके, हर्षवर्धन चव्हाण, आर. ए. पाटील, विठ्ठल निकम, भोपाल भिसे, आण्णाप्पा रोकडे, उत्तम निकम, शुभम भिसे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

हेही वाचा :

Back to top button