तेलाचे कॅन चोरणारा आरोपी जेरबंद; लोणावळा पोलिसांची जलद गतीने कारवाई | पुढारी

तेलाचे कॅन चोरणारा आरोपी जेरबंद; लोणावळा पोलिसांची जलद गतीने कारवाई

लोणावळा; पुढारी वृत्तसेवा : येथील मॅक्डोनल्डस रेस्टॉरंटच्या स्टोअररूममधून तब्बल 72 हजार रुपये किमतीचे तेलाचे कॅन लंपास करणार्‍या चोरट्याला लोणावळा पोलिसांच्या जलदगती कारवाईमुळे रंगेहाथ जेरबंद करण्यात यश मिळाले. सुमंत सुनील पडवळ (वय 24 वर्षे, रा. दत्तनगर, सरोदय स्कूलजवळ, अंबरनाथ वेस्ट, जि. ठाणे) असे ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

मॅक्डोनल्डस रेस्टॉरंटमध्ये स्टोअर मॅनेजर म्हणून काम करणार्‍या अक्षय अशोक चव्हाण (वय 26 वर्षे, रा. शिलाटणे, ता. मावळ, जि. पुणे) यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार रेस्टॉरंटमध्ये वापरासाठी लागणारे तेलाचे कॅन आणून ठेवले जातात. मात्र, 12 ऑक्टोबर ते 13 नोव्हेंबर या दरम्यान मॅक्डोनल्डस रेस्टॉरंटच्या स्टोअररूममधून तीन वेगवेगळ्या तारखेला येथे ठेवलेले तेलाचे कॅन चोरीला जात असल्याचे हॉटेल व्यवस्थापनाच्या लक्षात आले. त्यांनी सीसीटीव्ही कॅमेरे फुटेज तपासले असता एक व्यक्ती रेस्टॉरंटच्या खालील मजल्यावरील स्टोअररूममध्ये असलेले तेलाचे कॅन घेऊन जात असलेला दिसला.

रविवारी, दि. 13 नोव्हेंबर रोजी फिर्यादी अक्षय चव्हाण यांना सकाळी 10 वाजेच्या सुमारास सीसीटीव्हीमध्ये दिसलेली व्यक्ती मॅक्डोनल्डस रेस्टारंटमध्ये दिसल्याने त्यांना संशय आला, आणि त्यांनी पोलिस कॉन्स्टेबल विकास कदम यांना फोन केला. यावर विकास कदम यांनी फिर्यादी अक्षय चव्हाण यांना त्याच्या स्टाफसह सतर्क राहण्याच्या सूचना दिली आणि तात्काळ ही घटना पो. नि. सीताराम डुबल यांना कळवली. पो. नि. डुबल यांच्या मार्गदर्शनाखाली विकास कदम यांनी वेळ न दवडता त्वरित रेस्टॉरंटकडे धाव घेतली.

दरम्यान, फिर्यादी अक्षय चव्हाण यांनी स्टोअररूममध्ये जाऊन पाहिले असता तेथे माल कमी दिसला. त्यावर त्यांनी स्टोअररूमचे खाली असलेले पार्किंगमध्ये जाऊन पाहणी केली असता तेथील पायर्‍यांच्या खाली ऑईलचे दोन बॉक्स दिसले. थोड्याच वेळात 10.15 वाजण्याच्या सुमारास संशयित सुमंत पडवळ हा पार्किंगमध्ये आला व त्याने खाली असलेले दोन ऑईलचे बॉक्स घेतले व पांढरे ज्युपिटर स्कूटरचे फूट स्पेसजवळ ठेवले व जाण्यास निघाला. त्याचवेळी समोरून आलेले पोलिस कॉन्स्टेबल कदम यांना पाहून तो गडबडला आणि खाली पडला. त्यानंतर त्याने तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, कॉन्स्टेबल कदम यांनी प्रसंगावधान दाखवीत फिर्यादी यांच्या मदतीने आरोपी सुमंत पडवळ याला जेरबंद केले.

Back to top button