कितीही सत्तांतरे होऊ देत, २०२४ पर्यंत ‘मविआचा मुख्यमंत्री’ होईल, संजय राऊतांचा दावा | पुढारी

कितीही सत्तांतरे होऊ देत, २०२४ पर्यंत 'मविआचा मुख्यमंत्री' होईल, संजय राऊतांचा दावा

पुढारी ऑनलाईन डेस्क : राज्यातील सध्याचे राजकीय वातावरण हे अस्थिर आहे. परंतू राज्यात कितीही सत्तांतरे झाली तरी, मी बाहेर असो अथवा यांनी मला पुन्हा जेलमध्ये टाकले तरी पुन्हा राज्यात मविआचे सरकार येईल. २०२४ पर्यंत मविआचा मुख्यमंत्री होईल याची आम्हाला पूर्णपणे खात्री असल्याचे मतही शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे.

अनेक नेत्यांची चूक नसताना त्यांच्यावर गुन्हे दाखल होत आहेत. कार्यालयांवर चुकीच्या पद्धतीने हातोडे पडत आहेत. याविरूद्ध जनतेच्या मनात उद्रेक आणि तीव्र नाराजी आहे आणि ती वेळोवेळी व्यक्तही होत आहे. पण आम्ही याविरूद्ध लढत राहू आणि हळूहळू सगळेच नेते बाहेर येतील. पुन्हा एकदा आकाश निरभ्र होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

वाढदिनी ईश्वराकडे प्रार्थना

जितेंद्र आव्हाड यांच्याविरूद्ध सुरू असलेले प्रकरण हे खोटे आहे. या प्रकारच्या विकृतीतून कोणाला काय आनंद मिळतो काय माहित. पण हे सगळं थांबायला हवं. सध्या राज्यात राजकीय अस्थिरता आहे. सध्याच्या घटना पाहता, महाराष्ट्राने आपली राजकीय संस्कृती, परंपरा जपली पाहिजे. या परिस्थितीत आपली राजकीय परंपरा जपत, पुन्हा एकदा पारदर्शकपणे काम केले पाहिजे. अशी मी आजच्या माझ्या वाढदिवसादिवशी ईश्वराकडे प्रार्थना केल्याचे मत संजय राऊत यांनी व्यक्त केले. संजय राऊतांना आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक राजकीय नेत्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

शिवसैनिकांचे रक्त स्वस्त नाही

ठाण्यात शिंदे गटातील कार्यकर्त्यांकडून ठाकरे गटीतील शिवसैनिकांवर अन्याय आणि हल्ले होत आहे. यावर बोलताना ते म्हणाले, तुम्ही जर सत्ता, पैशाची ताकद दाखवून शिवसैनिकांचे रक्त सांडत असाल तर शिवसेनेच्या शिवसैनिकांचे रक्त इतकेही स्वस्त नाही हे त्यांनी लक्षात ठेवावे. आजपर्यंत ज्यांनी शिवसेनेचे रक्त सांडण्याचा प्रयत्न केला ते नेस्तनाबूत झाल्याचेही ते म्हणाले.

हेही वाचा:

 

Back to top button