कोल्हापूर : ढगफुटी सदृश्य पावसामुळे पालघाटात कोसळली दरड | पुढारी

कोल्हापूर : ढगफुटी सदृश्य पावसामुळे पालघाटात कोसळली दरड

गारगोटी; पुढारी वृत्तसेवा : भुदरगड तालुक्यात ढगफुटी सदृश्य झालेल्या पावसामुळे गारगोटी गडहिंग्लज मार्गावरील पालघाटात दोन ठिकाणी दरड कोसळल्यामुळे वाहतूक ठप्प झाली. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने मलबा काढण्याचे काम सुरू आहे.

भुदरगड तालुक्यात गेले चार दिवस मुसळधार पाऊस कोसळत आहे. आज (दि.१४) सहाच्या सुमारास जोरदार पावसाला सुरुवात झाली. विजांच्या कडकडाटासह दोन तास जोराचा पाऊस झाला. ढगफुटीसदृश्य पावसामुळे पालघाटात दोन ठिकाणी दरडी कोसळल्या. तसेच, पालघाटातील नाल्यांमधून जोराचा पाण्याचा प्रवाह रस्त्यावरून वाहत होता.

पालघाटात दरडी कोसळल्यामुळे गडहिंग्लज – आजरा व गारगोटीला होणारी वाहतूक ठप्प झाली. घाटात बस, ट्रॅव्हल्स व चार चाकी वाहने अडकून पडली. सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता राहुल पाटील, शुभम कोले, अक्षय गडदे यांनी घटनास्थळी तातडीने धाव घेऊन दोन जेसीबी पाचारण केले. जेसीबीच्या साह्याने मलबा काढण्याचे काम सुरू आहे. अंधार व पावसामुळे मातीच्या ढिगारे हटविण्यात अडथळे निर्माण झाले आहेत.

सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता राहुल पाटील, शुभम कोले, अक्षय गडदे यांनी घटनास्थळी तातडीने धाव घेऊन दोन जेसीबीच्या मलबा काढण्याचे काम सुरू केले. कचरा डेपो जवळ व धबधब्याच्या ठिकाणी दरड कोसळली. अंधार व पावसामुळे मातीच्या ढिगारे हटविण्यात अडथळे निर्माण झाले होते. रस्त्यात दगडगोटे पडले होते. रात्री ९.३० वा. सुमारास वाहतूक सुरळीत झाली. दरम्यान, गारगोटी सालपेवाडी ओढ्यावर पाणी आल्याने काही काळ वाहतूक बंद पडली होती तर गारगोटी बाजारातील व्यापारी संकुलातील दुकानात पाणी शिरले होते त्यामुळे दुकानदारांची एकच तारांबळ उडाली होती. आकुर्डे येथील संजय कुंडलीक भांदीगरे यांचे राहते घर कोसळल्यामुळे प्रापंचिक साहित्यासह लाखो रुपयांचे नुकसान झाले.

हेही वाचा;

Back to top button