कोल्हापूर : कनवाड येथील गणेश विसर्जन मिरवणुकीत करबल मेल पथकाचे सादरीकरण | पुढारी

कोल्हापूर : कनवाड येथील गणेश विसर्जन मिरवणुकीत करबल मेल पथकाचे सादरीकरण

शिरटी (कोल्हापूर) : पुढारी वृत्तसेवा : हिंदू – मुस्लिम धर्मामध्ये असणाऱ्या बंधुत्वाची साक्ष देणारी, अशी अनेक उदाहरणे आहेत. याचाच प्रत्यय शिरोळ तालुक्यातील कनवाड येथील गणेश विसर्जन मिरवणुकीत पहायला मिळाला. कनवाड येथील गोल्ड स्टार गणेश मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीत येथील मुस्लिम समाजातील चांद वस्ताद करबल मेल आणि ताज वस्ताद करबल मेल या पथकांनी विनामूल्य आपली कला सादर करून विसर्जन मिरवणtक शांततेत पार पाडली. यावेळी हिंदू-मुस्लिम ऐक्याचे दर्शन घडले.

कनवाड येथे ७५ टक्के मुस्लिम बांधव आणि २५ टक्के इतर समाजाचे लोकसंख्या असून हे सर्वजण गुण्यागोविंदाने राहतात. पीर हजरत झानिया बाबा हे येथील ग्रामदैवत असून दरवर्षी एप्रिल महिन्यात त्यांचा उरूस मोठ्या उत्साहात सर्वधर्मीय साजरा साजरा करतात. याचप्रमाणे गणेशोत्सवदेखील सर्वधर्मीय लोक एकत्र येऊन साजरा करतात.

गुरुवारी गोल्ड स्टार गणेश मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीत चांद वस्ताद आणि ताज वस्ताद या करबल पथकांनी हिंदू मुस्लिम ऐक्याचा संदेश देणारे गीत सादर केले. यावेळी पथकातील ६० वर्षाचे शहानवाज पिरजादे यांनी, ”मनात नाही भेदभाव, म्हणतात याला कनवाड गाव कशाला पाहिजे हिंदू मुस्लिम, आम्ही भारतीय अहो आम्ही भारतीय” हे गीत सादर करून उपस्थितांची मने जिंकली. यावेळी मंडळाचे संस्थापक अध्यक्ष आणि सरपंच बाबासो आरसगोंडा यांनीही गाण्याच्या तालावर ठेका धरला.

यावेळी काकासो सुतार, गुलाबहुसेन पाथरवट, किस्मतपाशा इनामदार, माणिक सनदी यासह करबल पथकाचे खेळाडू व गणेश मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Back to top button