धक्कादायक! आठ महिन्याच्या चिमुकलीला दिले HIV संक्रमीत रक्त | पुढारी

धक्कादायक! आठ महिन्याच्या चिमुकलीला दिले HIV संक्रमीत रक्त

अकोला; पुढारी वृत्तसेवा : HIV अकोला जिल्ह्यात मूर्तिजापूर तालुक्यातील हिरपुर येथील एका आठ महिन्याच्या चिमुकलीला एचआयव्ही संक्रमित व्यक्तीचे रक्त चढवल्याने चिमुकली संक्रमित झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. या चिमुकलीला अकोला येथील बी.पी. ठाकरे रक्तपेढीतून आणलेले रक्त चढवण्यात आले होते. संबधित मुलीच्या वडीलांनी आरोग्य मंत्र्यांकडे तक्रार दाखल केली आहे.

हिरपूर येथील दाम्पत्याने आपल्या आठ महिन्याच्या चिमुकलीला मूर्तिजापूर येथील एका खासगी रुग्णालयात भरती केले. डॉक्टरांनी तिच्या पांढ-या पेशी कमी असल्याचे सांगून अकोला येथील बी. पी. ठाकरे रक्त पेढीमधून पांढरे रक्त आणण्यास सांगितले. हेच रक्त मुलीला चढवण्यात आले.

मात्र, तरीही मुलीचा ताप कमी होत नव्हता. त्यामुळे जास्त वेळ न घालवता सदर बालीकेला मूर्तिजापूर येथून अमरावती येथील एका खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. तेथील डॉक्टरांना एचआयव्ही असल्याचा संशय आल्याने बालीकेची एचआयव्ही तपासणी केली. तपासणीअंती तिचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने या दाम्पत्यांची पायाखालची जमीनच सरकली.

यानंतर मुलीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने डॉक्टरांनी आईवडीलांना एचआयव्ही तपासणी करण्यास सांगीतले असता दोघांचाही अहवाल निगेटिव्ह आला.

त्या दोघांचाही अहवाल निगेटिव्ह असताना मुलगी पॉझिटिव्ह कशी आली? ही शंका त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती त्या दिशेने शोध घेतला असता संक्रमित रक्त चढविल्याने तिही संक्रमित झाल्याचे निष्पन्न झाले.

डॉक्टरांनी सांगितलेल्या रक्तपिढीतून हे रक्त आणण्यात आले होते, रक्तपेढी कडून झालेल्या अक्षम्य चुकीमुळे चिमुकलीला या भयंकर आजाराचा आयुष्यभर सामना करावा लागणार आहे.

आता न्याय मिळण्यासाठी चिमुकलीच्या पित्याने आरोग्य मंत्री, पालकमंत्री, जिल्हाधिकारी यांच्या सह विविध ठिकाणी तक्रार दाखल केली आहे.

एखाद्या आजारापासून संक्रमीत व्यक्तीचे रक्त इतर रुग्णांना देता येत नाही. यासंदर्भात असे झाले असेल तर तो मोठा गुन्हा आहे. याबाबत अद्याप तक्रार प्राप्त झाली नाही. चौकशीअंती रक्तपेढीवर कारवाई करू.
– डॉ.राजकुमार चौव्हाण (आरोग्य उपसंचालक, अकोला)

 

मुलीच्या शरीरातील पांढ-या पेशी कमी झाल्याने तीला रक्ताची गरज होती. आमच्याकडे आलेले रक्त रक्तपेढीतून तपासणी होवून आले आहे. असे आम्ही गृहीत धरतो. तसेच नातेवाईकांनी आणलेले रक्त आम्ही तीला चढवले. ते पॉझिटिव्ह असल्याचे माहिती नव्हते.
-डॉ.प्रशांत अवघाते, मुर्तिजापूर

Back to top button