कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा बिनखांबी गणेश मंदिरातील इच्छापूर्ती गणेशाचे मूळ रूप आजपासून भाविकांना पाहता येणार आहे. मागील एका महिन्यापासून मूर्तीवरील वर्षानुवर्षे असणारा शेंदुराचा थर हटविण्याचे काम पश्चिम महाराष्ट्र देवस्थानच्या पुढाकारातून सुरू होते. दि. 21 रोजी विधिवत गणेशाची पुनर्प्रतिष्ठापना व सकाळी 10 वाजता गणेशयाग करण्यात येणार असल्याचे देवसथान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे यांनी सांगितले.
करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरालगतच असणारा बिनखांबी गणेश मंदिरातील इच्छापूर्ती गणेश अनेकांचे श्रद्धास्थान आहे. करवीर संस्थानचे छत्रपती संभाजीराजे (दुसरे) यांच्या आदेशानुसार चिरेबंदी दगडात बिनखांबी गणेश मंदिराचे बांधकाम झाले. मंदिराला खांब नसणे हे एक वेगळेच वैशिष्ट्य मानले जाते. महाराणी ताराराणी यांनी सातार्याचे जोशीराव यांना धर्मशास्त्राचे मार्गदर्शन करण्यासाठी कोल्हापुरात आणले होते. जोशीरावांच्या घराण्याचे उपास्य दैवत गणपती असल्याने कोल्हापुरातील गणेश देवालये सर जोशीराव यांचीच असल्याचे सांगितले जाते. शेकडो वर्षांपासून या मूर्तीवर चढलेला शेंदुराचा थर काढून मूळ रूपात ही मूर्ती आणण्यासाठी देवस्थान समितीने प्रयत्न सुरू केले होते.
तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली या मूर्तीवरील शेंदूर हटविण्यात आला असून अलंकारांसह मूर्तीचे मूळ रूप झळाळून निघाले आहे. रविवारी विधिवत पूजा करून मूर्तीची पुनर्प्रतिष्ठापना होणार आहे.
हेही वाचा