कोल्हापूर : बाप्पांना रेशमी वस्त्रांचा साज

कोल्हापूर : बाप्पांना रेशमी वस्त्रांचा साज
Published on
Updated on

कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा : गणरायाचे रूप मूळचेच देखणे; पण त्याचे ते रूप आणखी खुलवण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून गणेशमूर्तींना रेशमी वस्त्रांचा साज चढवला जात आहे. माझा बाप्पा रुबाबदार आणि इतरांपेक्षा वेगळा असावा, अशी प्रत्येक भक्ताची निस्सीम इच्छा लक्षात घेत कुंभारवाड्यांमध्ये शेला, धोतर आणि फेटे मूर्तींना परिधान करण्यात येत आहेत. दोन वर्षे गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा झाला होता. यंदा मात्र थाटामाटात बाप्पांच्या आगमनाची तयारी सुरू आहे.

गणेश भक्तांना दरवर्षी मूर्तीमध्ये नावीन्य हवे असते. म्हणूनच मूर्तिकारदेखील आधुनिकतेकडे वळू लागले आहेत. पूर्वीच्या रंगसंगतीला आधुनिकतेची जोड देत रंगकाम केलेले धोतर, शेले, फेटे यापेक्षा तेच खरेखुरे रेशमी धोतर, बनारसी शेले, विविध प्रकारचे फेटे परिधान करू लागले आहेत. मूर्तीच्या मुकुटाला किंवा मातीच्या दागिन्यांना सोनेरी आणि सिल्व्हर शाईचा मुलामा देण्याऐवजी त्या ठिकाणी इमिटेशन ज्वेलरीचा उपयोग करून दागिने आणि मुकुट तयार केले जाऊ लागले आहेत.

यंदा गणेशमूर्तींमधील वैविध्य आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरत असून, राजेशाही फेटे, बाजीराव पेशवा, शिंदेशाही फेटे, बाळूमामांच्या फेट्याच्या मूर्ती आकर्षक ठरत आहेत. अगदी एक फुटापासून दहा फुटांपर्यंतच्या गणेशमूर्तींना आकर्षक फेटे, शेला आणि धोतर परिधान करण्यात येत आहे. या फेट्यांना कडेने पैठणीचे, सोनेरी लेसची बॉर्डर करण्यात आली असून, मध्यभागी रत्नजडीत खडे बसवलेला राजेशाही थाट भक्तांचे मन मोहून घेत आहे.

मूर्तींच्या मागणीनुसार हे फेटे बाजारात उपलब्ध आहेत. या फेट्यांसाठी लागणारा कच्चा माल राजस्थान, सुरत, अहमदाबाद येथून मागवला जातो. गणेशोत्सवाच्या आगमनापूर्वी महिनाभर आधीपासून मूर्तींवर साज चढवण्यासाठी कारागीर कुंभारवाड्यांत राबत आहेत. फेट्यांसाठी खास पैठणी, इरकली, राजस्थानी कॉटन, चंदेरी, वेलवेट कापड प्रकारांना मागणी असून, केशरी, पिवळा आणि गुलाबी रंगांना भक्तांची पसंती लाभते आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news