यंदा शाडूच्या गणेशमूर्ती महागल्या; कारागिरांची रंगकामासाठी लगबग | पुढारी

यंदा शाडूच्या गणेशमूर्ती महागल्या; कारागिरांची रंगकामासाठी लगबग

येरवडा; पुढारी वृत्तसेवा: गणेशोत्सव अवघ्या दहा दिवसांवर येऊन ठेपला आहे. बाजारपेठा सजल्या आहेत. कुंभारवाड्यात मूर्तीकारांची गणेशाच्या मूर्तीला रंगकाम करण्यासाठी लगबग सुरू झाली असून, गतवर्षीच्या तुलनेत प्लास्टर ऑफ पॅरिस, शाडूच्या मूर्तीच्या किंमती महागल्या आहेत. लोहगावमधील कुंभारवाड्यात गणेशाच्या आकर्षक मूर्ती बनविल्या जातात. परंपरागत व्यवसाय करणारे बाळासाहेब कुंभार यांच्या घरी गणेशमूर्ती बनविल्या जातात. याविषयी त्यांच्याकडून माहिती घेतली असता ते म्हणाले की, आम्ही गेल्या अनेक वर्षांपासून गणेशमूर्ती बनवितो. या वर्षी गणेशमूर्ती बनविण्यासाठी लागणार्‍या सर्वच वस्तू महागल्याने गणेशमूर्तीच्या किमतीही वाढल्या आहेत.

दगडू शेठ गणपती, लालबागचा राजा, फुलातील गणपती, बैठा गणपतीला जास्त मागणी आहे. आपण सुमारे तीन हजार लहान-मोठे गणपती बनवत असून, सर्व र्मू्ती ग्राहकांनी अगोदर बुकिंग करून ठेवलेल्या आहेत. सर्वच गणपतींना एक हात रंग देऊन झालेला आहे. फायनल गणपती रंगवण्याचे काम सुरू आहे. 31 सप्टेंबरला गणपती असून जसजशी तारीख जवळ येईल, तसे आम्हाला रात्रभर जागून गणपतीला रंग देऊन मूर्तीची आकर्षक सजावट करावी लागते, असेही त्यांनी सांगितले.

Back to top button