वाढते वय आणि महागाईला कोणीही रोखू शकत नाही. जर तुम्हाला आर्थिक स्वातंत्र्य हवे असेल, तर वाढत्या वयानुसार दैनंदिन खर्च कसा वाढणार आहे? ते पाहणे आर्थिक स्वातंत्र्याची पहिली पायरी आहे. हे दर्शविणारे आर्थिक स्वातंत्र्य लेखमालेतील पहिला भाग पुढीलप्रमाणे आहे.
सकाळी उठायचे आणि कामाला लागायचे. दर महिन्याला काम करून पैसा घरात आणायचा आणि खर्च करायचा, हे अनेकांचे रहाटगाडगे चालत असते. दर महिन्याला कुटुंबाचा दैनंदिन खर्च भागवायला पाहिजे; औषधोपचार खर्च, मुलांच्या शिक्षणाची तरतूद, मुलांच्या लग्नासाठी खर्च केला पाहिजे; राहणीमानाच्या वाढत्या दर्जानुसार नवीन गाडी घ्यायची आहे, नवीन घर घ्यायचे आहे, व्यवसाय वाढवायचा आहे; होम लोन, कार लोन फेडायचे आहे, परदेशी दौरा करायचा आहे, कुटुंबाला भरभरून सुख द्यायचे आहे, अशा अनेक विवंचना डोक्यात ठेवून कुटुंबप्रमुख हा नोकरी किंवा व्यवसाय करीत असतो.
आज प्रत्येकाला कामाचे प्रेशर आहे. सकाळी उठून काम करायला नको वाटते, पण नाइलाजास्तव काम करावेच लागते. आज जगाच्या भोवती लाखो (डॉलर) पैसा फिरत असताना, प्रत्येकजण पैशाच्या भोवती फिरताना दिसतो. पैसा माणसाला स्वस्थ बसू देत नाही. पैसा माणसाला कामासाठी पळवतो, म्हणजेच पैसा आपल्याला नाइलाजास्तव काम करायला भाग पाडतो. पैशासाठी आपण गुलामासारखे वर्षानुवर्षे काम करीत असतो. या सर्व गोष्टींतून आपली सुटका होईल का? ही सुटका झाली तर तुम्हाला खर्या अर्थाने आर्थिक स्वातंत्र्य मिळाले, असे होईल.
प्रत्येक महिन्याला माझ्या कुटुंबाला खर्चासाठी लागणारा पैसा माझ्या खात्यामध्ये कोणतेही काम न करता आला पाहिजे. सकाळी उठून कामाला जायचे टेन्शन नसावे. मला मनसोक्त आणि स्वच्छंदी जगायचे आहे. अशी आर्थिक परिस्थिती आपल्या जीवनात येणे म्हणजे आर्थिक स्वातंत्र्य आले म्हणून समजायचे. दररोज पैशासाठी काम करायला न लागता पैशाने माझ्यासाठी काम केले पाहिजे. असे पैशाचे नियोजन आपल्या आयुष्यात केले पाहिजे. दर महिन्याला माझ्या गरजेनुसार माझ्या खात्यामध्ये पैसा जमा होण्यासाठी प्रथम मला कोणत्या वर्षापासून आर्थिक स्वातंत्र्य हवे आहे, हे ठरवावे लागेल.
आजपासून दहा, पंधरा, वीस की पंचवीस वर्षे हे ठरविले पाहिजे. त्या वर्षांनंतर मला नियमितपणे उत्पन्न हे अखेरच्या श्वासापर्यंत दरमहा मिळायला हवे. त्यासाठी माझे जीवनमान किमान 80 ते 85 वर्षे आपण आयुष्य आहे, असे समजून नियोजन केले पाहिजे. वाढत्या महागाईनुसार दरमहा नियमितपणे उत्पन्नाचे नियोजन करण्यापूर्वी ठराविक कालावधीनंतर किती पैसा हवा, हे पाहावे लागेल. तुमचे सध्याचे वय किती वर्षे आहे? दर महिन्याला खर्च किती येतो? हा खर्च वाढत्या महागाईनुसार कसा वाढत जाणार आहे. आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत दरमहा किती किती पैसा हवा? या गोष्टी पहाव्या लागतील.
समजा, तुमचे वय 32 वर्षे असेल आणि सध्याचा खर्च 25000/- असेल, 7% महागाई गृहीत धरली. आणि आपले आयुष्यमान 80 वर्षे गृहीत धरले, तर दर पाच वर्षांनी खालील प्रमाणे खर्च कसा वाढणार आहे, या गोष्टीचा विचार करणे गरजेचे आहे.
आर्थिक स्वातंत्र्याचे तयारी करताना वरीलप्रमाणे मला माझ्यासाठी पैशाचा प्रवाह निर्माण करावा लागेल. वरील आराखड्यामध्ये मला आज 2021 ला वयाच्या 32 व्या वर्षी 25000 खर्च असेल, तर 7% महागाईनुसार 2041 सालात 52 व्या वर्षी दरमहा एक लाख रुपये, 2051 साली 63 व्या वर्षी दोन लाख महिन्याला खर्च असणार. हाच खर्च 2066 साली जेव्हा तुमचे वय 77 असेल तेव्हा दरमहा 6,06,381 इतका खर्च असणार आहे. हे आकडे न पटणारे आहेत; पण वाढत्या महागाईनुसार असा वाढणारा खर्च हे वास्तव असणार आहे.
पैशाचा प्रवाह समजून घ्या
आज तुम्ही पैशासाठी काम करीत आहात. दरमहा येणार्या पैशातून चांगल्या प्रमाणात पैसा वाचवला पाहिजे, आणि तो कामाला लावता आला पाहिजे. पैशाला काम लावले तर तो वाढेल आणि महागाईवर मात करेल. ही शास्त्रशुद्ध कला आहे अन् हे प्रत्येकाने शिकले पाहिजे. तरच तुम्हाला आर्थिक स्वातंत्र्याकडे वाटचाल करणे सोपे जाईल.
हे ज्यांना जमणार नाही, त्यांना मात्र आयुष्यभर पैशासाठी मरमर काम करावे लागेल. आणि कामाचे टेन्शन घेऊन जगावे लागेल. ही गोष्ट त्यांनी सदैव लक्षात घेतली पाहिजे. पैशाचा प्रवाह कसा असावा, हे समजावून घेणे ही आर्थिक स्वातंत्र्याची पहिली पायरी आहे.
(लेखक एस. पी. वेल्थ, कोल्हापूरचे प्रवर्तक आहेत.)