मुंबईत ९७% लाेकांनी केली कोरोनावर मात! | पुढारी

मुंबईत ९७% लाेकांनी केली कोरोनावर मात!

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : मुंबईत आतापर्यंत 7 लाख 43 हजार 153 नागरिकांना कोरोनाची लागण झाली. पण, यातील तब्बल 97 टक्के मुंबईकर कोरोनावर मात करून, घरी परतले. तर, 2 टक्के नागरिकांना आपला जीव गमवावा लागला. यात काही दीर्घकालीन आजार असलेल्या नागरिकांचाही समावेश आहे.

देशातील अन्य शहरांच्या तुलनेत मुंबईत कोरोना संसर्ग झालेल्या नागरिकांची संख्या सर्वाधिक आहे. कोरोनाशी झुंज देत काही नागरिक बरे होऊन घरी परतले. मात्र आपले कर्तव्य बजावत असताना, शासकीय, महापालिका कर्मचारी व अधिकारी, आरोग्य कर्मचारी, बेस्ट, एसटी कर्मचार्‍यांनी आपला जीव गमावला.

अनेकांनी आपले आई-वडील तर काहींनी आपली मुले गमावली. मुंबईत आतापर्यंत 15 हजार 972 जणांचा कोरोनाने बळी घेतला. सर्वाधिक मृत्यू 60 वर्षांवरील नागरिकांचा झाला. मुंबईत कोरोनाने बरे होणार्‍या नागरिकांची टक्केवारी 97 टक्के असून आतापर्यंत 7 लाख 21 हजार 759 कोरोनाबाधित नागरिक बरे झाले.

मुंबईत सर्वाधिक 55 हजार 332 रुग्ण सापडलेल्या अंधेरीमध्ये 54 हजार 188 जण बरे झाले. बोरिवलीमध्ये 51 हजार 689 कोरोना बाधित नागरिकांपैकी 50 हजार 417 नागरिक बरे होऊन घरी परतले. मुंबई आतापर्यंत 7 लाख 43 हजार 153 नागरिकांना कोरोनाची लागण झाली असली तरी, या नागरिकांच्या संपर्कात आलेल्या तब्बल 80 लाख 26 हजार 146 नागरिकांना क्वारंटाईन करण्यात आले होते. या 42 हजार 237 नागरिकांना त्यांच्या घरीच क्वारंटाईन करण्यात आल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले.

Back to top button